निवडणूक आयोगाने कायद्याचा अयोग्य अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणे ही चूक; देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका पुढे ढकलल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक पुढे ढकललेल्या ठिकाणी आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असून निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे. उद्या निवडणुका असून आज निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय खूप चुकीचा आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचं आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Comments are closed.