पाण्याची बोंब… एक बॅरल 100 रुपये; गावपाड्यांवरील ग्रामस्थांचे हाल, मुरबाडमध्ये जलजीवन योजनेचे बारा वाजले
मार्च महिना सुरू होताच आदिवासीबहुल मुरबाड तालुक्याला पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. २२ गावे व ३४ पाड्यांवरील माताभगिनींना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. मुरबाडमध्ये सरकारच्या जलजीवन योजनेचे बारा वाजले असून पाण्याच्या नावाने अक्षरशः बोंब आहे. एका बॅरलसाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. जलजीवन योजनेसाठी सरकारने मंजूर केलेले लाखो रुपये गेले तरी कुठे? असा संतप्त सवाल मुरबाडवासीयांनी केला आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना मुरबाडमधील गावपाड्यांना करावा लागतो. गेली अनेक वर्षे पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबवल्या, पण ही टंचाई काय दूर झाली नाही. यंदाही पावसाळा सुरू होईपर्यंत ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मिल्हे, गणेशपूर, कोळीवाडा, सावरेची वाडी येथे बैलगाड्यांवरून पाण्याची पिंपे आणली जातात. एका पिंपासाठी १०० रुपये मोजावे लागत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ घावक यांनी दिली.
लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत?
पाणीपुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार मुरबाड तालुक्यात ४० योजना पूर्ण झाल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात किती योजना पूर्ण झाल्या हे अजून समजू शकले नाही. जलजीवन मिशन योजनेचा तर बोजवारा उडाला असून पाण्याच्या एका बॅरलमागे १०० रुपये मोजावे लागत आहेत. पाण्याची ही परिस्थिती असताना स्थानिक लोकप्रतिनिधी एक शब्दही का बोलत नाहीत? असा सवाल मुरबाडकरांनी केला आहे.
माथेरानवासीयांची तहान भागवण्यासाठी अभय योजना लागू करा
माथेरानमधील रहिवाशांची तहान भागवण्यासाठी अभय योजना लागू करा, अशी मागणी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्याकडे केली आहे. रहिवासी, लॉजधारक, हॉटेल व्यावसयिक व व्यापाऱ्यांची पाणी बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. नळाचे कनेक्शन तोडण्याचा तगादा लावल्याने त्याचा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- मुरबाड तालुक्यात मिल्हे, गणेशपूर, कोळीपाडा, सावरेचा वाडा येथील किमान अडीच हजार लोकवस्ती असलेल्या या गावासाठी दीड वर्षापूर्वी दीड कोटीची जलजीवन मिशन योजना आखण्यात आली, पण ती डब्यात गेली आहे.
- कोरड्या विहिरीवर ही योजना राबविली जात असल्याने येथील शेकडो महिलांनी जून महिन्यात पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला होता, पण सरकारी यंत्रणेच्या हृदयाला पाझर फुटला नाही.
- दुसरी विहीर खोदून पाण्याची व्यवस्था करण्याबाबत महिलावर्ग ठाम असल्याने ही योजनाच बारगळली आहे. खासगी बोअरिंगवर १०० रुपये भावाने पाण्याचे पिंप भरून दिले जाते.
Comments are closed.