मुंबईत नववर्षाची सुरुवात पावसाने; अनेक भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या
मुंबईत नववर्षाची सुरुवात पावसाने झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासून मुंबईकरांच्या भेटीसाठी वरुणराजा हजर होता. मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. ढगाळ वातावरण, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस यामुळे मुंबईत थंडी गायब झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत आज हवामान सामान्यतः कोरडे आणि ढगाळ राहण्याची शक्यता होती, परंतु काही भागात ढग दाटून आले आणि आर्द्र परिस्थितीमुळे पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. दादर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, घाटकोपर, कांदिवली, मुलुंड, मानखुर्द, चेंबूर यांसह अनेक भागांत हलक्या सरी कोसळल्या आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला. वर्षाच्या पहिल्याच दिवशी पडलेल्या पावसामुळे ऐन थंडीत लोकांना स्वेटर टाकून छत्र्या, रेनकोट याची शोधाशोध करावी लागली.
सकाळच्या सुमारास कामाला जाणाऱ्या, तसेच जॉगिंग आणि सैर-सपाट्यासाठी निघालेल्या नागरिकांना अनपेक्षित पावसाने आश्चर्याचा धक्का बसला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पावसाची हजेरी लागल्याने मुंबईकरांसाठी वर्षाची सुरुवात अनोख्या वातावरणात झाली आहे. पुढील काही तास हवामानातील बदलांचे चित्र कसे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.