मुद्रा- अभिजात अनुभवविश्व
>> ट्रूपी सुनील कुमार सिंग
मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून एक समृद्ध विचारधारासंस्कृती आणि परंपरेचा अभिमानास्पद वारसा आहे. आशा बगे यांच्यासारखे साहित्यिक ही परंपरा नेटाने पुढे नेत आहेत. मराठीतील आघाडीच्या कथाकार अशी ओळख असणाऱया आशा बगे यांनी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून समर्थपणे मांडली आहे. त्यांच्या कथा व कादंबऱयांतील अनुभवविश्व मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारे असले तरी त्याची मांडणी वेधक आणि विचार करायला भाग पाडणारी आहे. येत्या 28 जुलै रोजी त्या वयाची 86 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या साहित्यसेवेचा घेतलेला आढावा…
आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने मराठी साहित्यविश्वात भर घालणारे सरस्वतीपुत्र मराठीला लाभले आहेत. समृद्ध मराठीचा वसा आणि वारसा अनेक साहित्यिकांनी जगासमोर मांडला आहे. मराठीतील अनेक प्रथितयश लेखक, कवींनी आपल्या साहित्यकृतींनी मराठीचा झेंडा अटकेपार रोवला. त्यापैकीच एक म्हणजे सर्जनशील साहित्यिका आशा बगे. मराठीतील आघाडीच्या कथाकार अशी ओळख असणाऱया आशा बगे यांच्या लेखन कारकीर्दीचा वेळोवेळी यथोचित गौरव करण्यात आला आहे.
कायम आनंदी व जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणाऱया आशा बगे यांचा जन्म 28 जुलै 1939 रोजी नागपूरमध्ये एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आई आणि आजीकडून त्यांना लहानपणीच साहित्याचा आणि संगीताचा वारसा लाभला. त्या संगीत आणि सणांच्या समृद्ध वातावरणात वाढल्या. त्यांनी मराठी साहित्य आणि संगीत या विषयांतून पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्या नाटय़, एकांकिका आणि रेडिओसाठी नाटक लेखन अशा उपक्रमांमध्येही सक्रिय होत्या. त्यांच्या या अनुभवाचा त्यांच्या लेखनशैलीवर खोल परिणाम झाला. संगीत, नृत्य आणि नाटय़कलेच्या विविध छटांचा अनुभव त्यांच्या कथालेखनात स्पष्ट जाणवतो.
साहित्याबरोबरच आशा बगे यांना संगीताचीही खूप आवड आहे. त्यांच्या लेखनात संगीताचा संदर्भ हमखास येतोच. स्त्रियांची घुसमट त्यांनी अनेक कथांमधून समर्थपणे मांडली आहे. त्यांच्या कथा व कादंबऱयांतील अनुभवविश्व मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारे असले तरी त्याची मांडणी वेधक आणि विचार करायला भाग पाडणारी आहे.
आशा बगे यांनी नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. त्यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून सुरू झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ 1980 साली प्रसिद्ध झाली. ‘मौज’ प्रकाशनाने आशा बगे यांच्या लेखनशैलीला आकार दिला. विदर्भ साहित्य संघाने पहिल्यांदा लेखिका संमेलन घेतले तेव्हा त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते.
आशा बगे यांचे साहित्य सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक तणावांवर आधारित असते. जुन्या पिढीने पारंपरिक संस्कृतीचे विचारपूर्वक अनुसरण केले असले तरी नक्या पिढीकडून त्याचे बौद्धिक विश्लेषण केले जाते. त्यांच्या कथा तार्किकता आणि सौंदर्य यांचा समतोल राखतात. संगीत या माध्यमातून त्या एक सांस्कृतिक सेतू निर्माण करतात.
आशा बगे यांचे साहित्य स्त्राrकेंद्रित असले तरी त्या फक्त स्त्रीवादी अजेंडा मांडत नाहीत. त्या कोणत्याही ‘इझम’च्या (वादाच्या) चौकटीत अडकत नाहीत. त्यांच्या स्त्राr पात्रांना कुठल्याही साचेबद्ध प्रतिमा नाहीत. त्या बिनधास्त, प्रामाणिक व परिपक्व असतात आणि एक विश्वासू माणूस म्हणून वागतात. त्यांची स्त्राr पात्रे पुरुष पात्रांशी संघर्ष करत नाहीत. त्यांच्या कथेचे वैशिष्टय़ असे आहे की, त्यांच्या कथा रूढ, पारंपरिक पद्धतीच्या कुटुंबकथा नाहीत. त्या मानवी नात्यांच्या कथा आहेत. या कथांमध्ये पात्रांचे इतरांशी निर्माण झालेले नाते शुद्ध मानवी आणि अस्सल आहे. त्यांच्या कथेचा उल्लेख केवळ रंजनाचा नसतो, तर तो नात्यांचा ओलावा जपण्याचा असतो. ‘मारवा’ आणि ‘रुक्मिणी’ या कथा अधिक शैलीदार कथा आहेत. यात जसे पारंपरिक विषय हाताळले आहेत तसे नव्या पिढीच्या भावभावनांचे वर्णन करणारेही विषय हाताळले आहेत.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून तो एक समृद्ध विचारधारा, संस्कृती आणि परंपरेचा अभिमानास्पद वारसा आहे. मराठी भाषेचा इतिहास हजारो वर्षे प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, समर्थ रामदास यांचे अभंग आणि ओव्या हे मराठी भाषेचे पहिले अभिजात साहित्य मानले जाते. कादंबरी, कथा, कविता, नाटक, बालसाहित्य, विनोद, समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, कीर्तन, पोवाडा, लावणी, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ असे साहित्य प्रकार हे फक्त मराठीतच आढळून येतात. आशा बगे यांच्यासारखे साहित्यिक ही परंपरा नेटाने पुढे नेत आहेत.
आशा बगे यांच्या कादंबऱ्यांमध्ये विविध स्तरांवरील मानवी संबंधांची सखोल मांडणी आहे. ‘त्रिदल’मध्ये कौटुंबिक भूमिका, क्मयावसायिक नातेसंबंध आणि मैत्रीची विविध रूपे साकारली आहेत. ‘सेतू’मध्ये विवाह संस्था, मैत्री, सांस्कृतिक ओढ, भूतकाळातील स्मृती, आधुनिक विचारधारा या सर्व घटकांवर आधारित विविध नात्यांची गुंफण आहे. त्यांच्या संवाद शैलीमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ आहे.
आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱयांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ कादंबरीला 2007 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. यात त्यांनी प्रथमच एका तामीळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. वयाच्या 86 व्या वर्षीही त्यांनी साहित्य लेखन परंपरा संथ गतीने सुरू ठेवली आहे. त्यांच्याशी संवाद साधला असताना त्या म्हणतात, ‘‘माझे लेखन अजून बंद झाले नाही. मात्र, वेग कमी झाला आहे.’’
Comments are closed.