मोबाइलमध्ये आता वाजणार नाही इमर्जन्सी अलार्म – TMarathiNews

एक महिन्यात सरकारने रोखली सेवा : यंत्रणांकडून होणार सुधारणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाइलवर तीव्र अलार्मसोबत पॉप-अप मेसेज निश्चितच आला असेल. आता काही दिवसांपर्यंत कोणाच्याही मोबाइलवर अशाप्रकारचा संदेश येणार नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही आवश्यक समीक्षा अन् सुधारानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी एनडीएमएने लोकांना नैसर्गिक आपत्तीबद्दल सतर्क करण्यासाठी एक सेवा सुरू केली होती. याच्या अंतर्गत लोकांच्या मोबाइल फोनवर एकाचवेळी जोरदार अलार्म वाजायचा आणि संदेशही फ्लॅश व्हायचा. हा सामान्य संदेशापेक्षा अत्यंत वेगळा असायचा. कुठल्याही आपत्कालीन संदेशाला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी याचा वापर केला जात होता.

काय आहे सेल ब्रॉडकास्ट सर्व्हिस

सरकारने मे महिन्यात ही सेवा सुरू केली होती. याच्या अंतर्गत लोकांना सतर्क केले जात होते. सेवा सुरू झाल्यावर अनेकदा लोकांना वादळ किंवा मुसळधार पावसाचे अलर्ट प्राप्त झाले. उत्तर भारतात वादळापूर्वी लोकांचे फोन वाजू लागले. या सेवेत तीव्र अलार्म हा संबंधितांचे लक्ष त्वरित संदेशाकडे वेधून सतर्क करण्यासाठी वाजतो.

का रोखली सेवा?

एनडीएमएने ही सेवा अस्थायी स्वरुपात का रोखले याचे कुठलेच ठोस कारण अद्याप देण्यात आलेले नाही. परंतु काही यंत्रणांसोबत मिळून हे तंत्रज्ञान आणखी अचूक करण्यासाठी याची समीक्षा केली जात असल्याचे जाणकारांचे सांगणे आहे. अशास्थितीत काही काळात ही सेवा पुन्हा सुरू केली जाऊ शकते. तसेच या सेवेत काही सुधारणा घडवून आणल्या जाऊ शकतात.

सेवेचे वैशिष्ट्या

इंटरनेटशिवाय हा अलर्ट मोबाइलवर प्राप्त होतो हे या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. याचबरोबर ब्रॉडकास्ट मेसेज त्वरित तुमच्या फोनमध्ये पोहोचतो, याकरता विलंब होत नाही. या मेसेजचा अलर्ट अत्यंत जोरात वाजत असल्याने त्वरित लक्ष वेधले जाते. याचबरोबर जेथे धोक्याच्या स्थितीची शक्यता आहे, अशाच लोकेशनवर हा संदेश पाठविला जात असतो. या तंत्रज्ञानाला सी-डॉट म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅक्टिस आणि गृह मंत्रालयाने मिळून विकसित केले आहे.

Comments are closed.