म्हणे… भोंदू खरातला स्वतःचं मरण दिसतंय
>> बाबासाहेब गायकवाड
सांगितलेला पूजाविधी केला नाही अन् त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर विनाश होईल, असे दुसऱयाचे भविष्य वर्तविणाऱया भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडीत आता स्वतःचे मरण दिसतेय, अशी चर्चा पसरविली जात आहे. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीतून अनेकांना मरणयातना देणाऱया खरातला नरकयातना होत असतील तर ते त्याच्या कर्माचे फळ आहे. त्याच्या पापात सहभागी असणारी सर्व घाण चव्हाटय़ावर येणे, कायदेशीर कारवाईने साफ होणे आवश्यक आहे.
भविष्य सांगून विविध पूजाविधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण व भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बहुचर्चित भोंदू अशोक खरात पोलिसांच्या विशेष तपासी पथकाच्या कोठडीत आहे. त्याला अटक होऊन एक महिना होत आला आहे. मात्र, त्याच्या काळ्या कृत्यांचा आलेख वाढतच चालला आहे. महिला अत्याचारांची सुमारे वीस, तर आर्थिक फसवणुकीची चारहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. टप्प्याटप्प्याने गुन्हे दाखल होत आहेत. भाविकांची आर्थिक फसवणूक, मालमत्ता हडपणे, विनाशाची भीती दाखवून अत्याचार करणे, बँका-पतसंस्थांमध्ये शेकडो बनावट खाते, बोगस पंपन्यांमार्फत शेकडो कोटींची आर्थिक उलाढाल, असा विक्रमी पापाचा घडा असल्याने पोलीस, आयकरसह ईडी चौकशीचा फेरा त्याच्याभोवती आहे. मागच्या दाखल गुह्याची पोलीस कोठडी संपली की, नव्या गुह्यात त्याची पोलीस कोठडी घेतली जात आहे. तपासी पथकाच्या चौकशीच्या जाचातून, तेथील यातनेतून सुटका होत नसल्याने खरात खचला आहे. काळ्या कृत्यांची भलीमोठी यादी आहे. त्याच्याशी संबंधित सर्वच स्वतःच्या बचावासाठी नामानिराळे झाले आहेत. अशा परिस्थितीत मरेपर्यंत आपली सुटका होऊ शकत नाही, अशी भावना त्याची झाली असावी. म्हणूनच आता इथून बाहेर पडणे अशक्य आहे, माझे मरण इथेच आहे, असे त्याने चौकशीदरम्यान बोलून दाखविले, अशी चर्चा आहे. त्याचा मृत्यू होण्याच्या अनेक शक्यता चर्चिल्या जात असल्या तरी तपासी यंत्रणेने त्याच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली असावी. जनक्षोभ उसळून हल्ला होऊन त्याच्या जीविताला धोका होऊ नये, यासाठी प्रत्यक्ष कोर्टात आणले जात नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर केले जाते. त्याला पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलेले नाही, तर महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या विस्तीर्ण अशा निसर्गरम्य हवेशीर ठिकाणी त्याची कोठडी असून तिथेच चौकशी होते.
सशस्त्र्ा बंदोबस्तामुळे विनातपासणी अन् विनाकारण अकादमीत कोणीही प्रवेश करू शकत नाही. बंदिस्त आणि सशस्त्र्ा सुरक्षिततेतून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातून त्याचे एन्काऊंटर अर्थात सोप्या पद्धतीने खात्मा होण्याचीही परिस्थिती नाही. शिर्डीसह अन्य ठिकाणचे गुन्हेही विशेष तपास पथकाकडेच वर्ग होण्याची शक्यता असल्याने त्याचा मुक्काम या सुरक्षित ठिकाणीच राहणार आहे. इतर ठिकाणच्या पोलिसांकडे खरातचा ताबा दिला गेलाच तरी त्याच्या जीविताची काळजी पोलीस घेतीलच. तसे झाले नाही अन् संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होण्याआधी, त्या सर्व संबंधितांवर कारवाई होण्यापूर्वी त्याचा मृत्यू होणे नियतीला मान्य होणार नाही.
Comments are closed.