दागिन्यांप्रमाणेच महिलांना घरात ठेवा!
ग्रँड मुफ्ती शेख अबु अहमद यांचे वादग्रस्त विधान
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुस्लीम धर्मगुरु आणि ग्रँड मुफ्ती असणारे शेख अबुबक्र अहमद यांच्या एका वादग्रस्त विधानाची सध्या बरीच चर्चा होत आहे. महिलांना घराबाहेर पडण्याची अनुमती देण्यात येऊ नये. दागिने ज्याप्रमाणे एका पेटीत घालून सुरक्षित ठेवण्यात येतात, त्याप्रमाणे महिलांना घरातच सुरक्षित ठेवण्यात यावे, असे विधान त्यांनी केले आहे. महिलांना सार्वजनिक स्थानी जाण्यास अनुमती दिल्यास सर्वनाश ओढवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
केरळमधील कोची येथे एका इस्लामिक परिषदेत भाषण करताना त्यांनी ही विधाने केली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार महिलांनी परदा किंवा बुरखा परिधान करुनच वावरले पहिजे. इस्लाममध्ये बुरख्याची सक्ती याच कारणासाठी करण्यात आली आहे. ज्या प्रमाणे एखादा सोन्याचा दागिना पेटीत बंद करुन ठेवला, तर त्याचे तेज टिकून राहते. मात्र, त्याला रस्त्याच्या कडेला ठेवले, तर कोणीही त्याला स्पर्ष करु शकतो. मग त्याचे मूल्य कमी होते. तशी घराबाहेर पडलेल्या महिलांची अवस्था होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. आता त्यावर टीकेची झोड उठली आहे.
अनेक वादग्रस्त विधाने
शेख अबुबक्र अहमद यांनी अनेकदा अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. महिलांनी पुरुषांप्रमाणे रस्त्यांवर उतरुन मुठी वळून घोषणा देऊ नयेत. इस्लाम अशा कृत्यांना अनुमती देत नाही. केवळ अत्यंत आवश्यक असेल, तरच महिलांनी एक पाऊल पुढे यावे, असे विधान त्यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. त्या विधानावर महिला कार्यकर्त्यांनी त्यावेळी मोठी टीका केली होती. तसेच त्यांना ट्रोल केले गेले.
नव्या विधानावर टीकेची झोड
महिलांसंबंधी त्यांनी केलेल्या नव्या विधानावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. केरळच्या कामगार कल्याण मंत्री बिंदू कृष्णन यांनी हे विधान नाकारले आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. तथापि, हे विधान समर्थन करण्यायोग्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. शेख अबुबक्र अहमद यांच्यावर मनी लाँडरिंग केल्याचे आणि भूखंड हडप केल्याचेही आरोप आहेत. या आरोपांनाही त्यांनी महिलांविषयी केलेल्या या विधानामुळे उजाळा मिळाला आहे.
स्त्री-पुरुष समानता इस्लामला अमान्य
महिला या पुरुषांपेक्षा नेहमीच आणि नैसर्गिकरित्या निकृष्ट प्रतीच्या असतात. त्या केवळ अपत्यांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे एव्हढ्या कामांसाठीच योग्य असतात. त्यामुळे इस्लामने स्त्री-पुरुष समानता नाकारली आहे, असे विधान त्यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये केले होते. तथापि, ते तोडून मोडून सादर करण्यात आले आहे, असा आरोप त्यांच्या समर्थकांनी नंतर स्पष्टीकरण देताना केला होता.
Comments are closed.