UAE च्या राष्ट्राध्यक्षांची भारताची संक्षिप्त भेट

पंतप्रधान मोदींनी विमानतळावर केले स्वागत : केवळ दोन तासात माघारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सोमवारी संध्याकाळी भारतात आले. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यात चर्चाही झाली. चर्चेचा तपशील उघड झाला नसला तरी या माध्यमातून द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्याचा प्रयत्न झाल्याचे ‘पीएमओ’ने म्हटले आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांनीच शेख मोहम्मद हे सोमवारी संध्याकाळी मायदेशी रवाना झाले. तथापि, या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी त्यांना अनेक खास भेटवस्तू देऊन निरोप दिला.

पंतप्रधान मोदींनी युएईच्या राष्ट्राध्यक्षांना गुजरातचा एक खास झूला, काश्मिरी पश्मीना शाल आणि काश्मिरी केशर भेट म्हणून दिले. हा शाही कोरीव लाकडी झूला अनेक गुजराती कुटुंबांच्या घरांचे मध्यवर्ती वैशिष्ट्या आहे. तो हाताने कोरलेला असून त्यात गुंतागुंतीच्या फुलांच्या आणि पारंपारिक डिझाइन आहेत. हा झुला उत्कृष्ट कारागिरीचे दर्शन घडवतो.

शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदींनी ‘मी माझे भाऊ, युएईचे अध्यक्ष, महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेलो होतो’ असे लिहिण्यात आले आहे. त्यांच्या या भेटीवरून दोन्ही नेते भारत-युएईच्या मजबूत मैत्रीला किती महत्त्व देतात हे जगाला दिसून आले. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर युएईच्या अध्यक्षांचे स्वागत करण्यासोबतच सोशल मीडियावर अरबी भाषेतही यूएईच्या अध्यक्षांसोबतच्या भेटीची माहिती दिली.

परराष्ट्र मंत्रालयाने शेअर केलेल्या माहितीनुसार शेख मोहम्मद केवळ दीड तासाच्या दौऱ्यावर भारतात आले होते. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शेख मोहम्मद यांचा अध्यक्ष या नात्याने भारताचा हा तिसरा दौरा होता. तसेच गेल्या 10 वर्षांतील त्यांचा हा पाचवा भारत दौरा आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि यूएईमधील संबंध अधिक घट्ट झाले आहेत. दोन्ही देशांनी विविध क्षेत्रातील व्यापारी संबंध अधिक दृढ केले आहेत.

Comments are closed.