‘वंदे मातरम्’चा अवमान केल्यास शिक्षा – TMarathiNews

होऊ शकतो कारवास आणि दंड, सरकारचा इशारा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कोणीही ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रगानाचा अवमान केल्यास, किंवा त्याच्या गायनामध्ये अडथळा निर्माण केल्यास संबंधिक व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची सोय असलेले विधेयक केंद्र सरकारकडून सादर केले जाणार आहे. हे विधेयक संसदेच्या आगामी वर्षाकालीन अधिवेशनात सादर केले जाणार आहे. या विधेयकानुसार हे गुन्हे करणाऱ्यास कारावास आणि दंड अशा शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात. या विधेयकामुळे वंदे मातरम् या राष्टगानाला जन गण मन या भारताच्या राष्ट्रगीताप्रमाणेच संरक्षण मिळणार आहे, अशी माहिती आहे.

हे विधेयक संमत झाल्यास 1971 च्या कायद्यामध्ये सुधारणा होणार आहे. 1971 च्या कायद्यानुसार जन गण मन या राष्ट्रगीताला संरक्षण पुरवण्यात आले आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्यास किंवा ते गाताना अडथळा निर्माण केल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्ष संबंधित व्यक्ती किंवा व्यक्तींना केली जाऊ शकते. तसेच दंडही होऊ शकतो, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तथापि, जुन्या कायद्यानुसार वंदे मातरम् या राष्टगानाला मात्र असे कायदेशीर संरक्षण देण्यात आलेले नाही. ते आता नव्या विधेयकाच्या माध्यमातून दिले जाणे शक्य आहे.

फेब्रुवारीतच नियम

केंद्र सरकारने फेब्रुवारीतच केंद्रीय गृहविभागाने सर्व राज्यांना या संदर्भात दिशानिर्देश पाठविले आहेत. या दिशानिर्देशांच्या अनुसार ‘वंदे मातरम्’चे गायन राष्ट्रगीताच्या आधी होणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व सरकारी कार्यक्रम किंवा सरकारी शिक्षणसंस्थांमधील कार्यक्रम यांच्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. आता या नियमाचे रीतसर कायद्यात रुपांतर केले जाणार आहे. हे वर्ष ‘वंदे मातरम्’ या राष्टगानाचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. वंदे मातरम् या राष्टगानाचा यथोचित सन्मान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे.

विधेयकात सर्व नियम स्पष्ट

संसदेत मांडल्या जाणाऱ्या विधेयकात वंदे मातरम् संदर्भातील सर्व नियमावली विस्तृतपणे स्पष्ट करण्यात आली आहे. कोणत्या कार्यक्रमांमध्ये ते गायचे आहे, कोणी गायचे आहे आणि कशाप्रकारे गायचे आहे, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या विधेयकात आहेत. हे विधेयक संसदेत संमत होईल, असा केंद्राला विश्वास आहे.

वंदे मातरमचा संक्षिप्त इतिहास

ख्यातनाम दिवंगत बंगाली साहित्यिक आणि विचारवंत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताची निर्मिती 150 वर्षांपूर्वी केली. त्यानंतर त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या गाजलेल्या कादंबरीत हे गीत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या गीताचे प्रारंभीचे शब्द ‘वंदे मातरम्’ हे भारताच्या स्वातंत्रसंग्रामासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. स्वातंत्र्यसंग्रामाचा जणू तो मंत्रच सिद्ध झाला. तथापि, 1937 मध्ये काँग्रेसने या संपूर्ण गीताची केवळ पहिली दोनच कडवी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या वादाला जन्म दिला. या गीतात दुर्गामातेचे वर्णन आहे, त्यामुळे मुस्लीमांच्या भावना दुखावतात, हे कारण यासाठी देण्यात आले होते. मात्र, आता केंद्र सरकारने ही त्रुटीही दूर केली आहे. आता ‘वंदे मातरम्‘ या राष्ट्रगानाचे गायन संपूर्णत: करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आगामी विधेयकातही याचा संदर्भ असून ते लवकरच संसदेत येणार आहे.

Comments are closed.