विरोधक-सत्ताधाऱ्यांचे शक्तिप्रदर्शन – TMarathiNews

रामलीला मैदानावर 19 विरोधी पक्षांची एकजूट : काँग्रेसविरोधात भाजपचाही मोर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राजधानीतील रस्त्यांवर रविवारी दोन राजकीय चित्रे निदर्शनास आली. एका बाजूला, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष रामलीला मैदानावर आपले शक्तिप्रदर्शन करत असताना दुसऱ्या बाजूला, भाजपने काँग्रेसविरोधात मोर्चा काढत प्रतिहल्ला चढवला. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग, एसआयआर आणि मतदार यादीवरून निर्माण झालेला वाद चर्चेत आणत थेट मोदी सरकारच्या राजकीय विश्वासार्हतेला लक्ष्य केले. तर, भाजपने आपल्या मोर्चाद्वारे काँग्रेसला टार्गेट केले आहे.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर एसआयआरच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी रॅली काढली. या रॅलीनंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि तेजस्वी यादव यांच्यासह 19 पक्षांचे नेते मंचावर उपस्थित होते. विरोधी पक्षांचा मोर्चा दुपारी 12 वाजता मिंटो जंक्शन येथून सुरू झाला आणि दुपारी 3 वाजता रामलीला मैदानावर पोहोचला. गेल्या 25 दिवसांत विरोधी पक्ष या मुद्यावर एकत्र येण्याची ही सातवी वेळ आहे. यापूर्वी 6 ते 13 ऑक्टोबर दरम्यान सहावेळा आंदोलने झाली होती.

रामलीला मैदानावरील सभेवेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. 2024 च्या निवडणुकीनंतर 13.5 कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. प्रत्येक सात मतदारांपैकी एकाचे नाव वगळण्यात आले, म्हणजेच 15 टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. याचवेळी त्यांनी आम्ही देशातून लोकशाही नाहीशी होऊ देणार नाही. आम्ही संविधानाचा नाश होऊ देणार नाही. तुमच्याकडे कितीही पैसा किंवा सत्ता असली तरी, तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. या देशात अनेक वर्षांपासून मतचोरी होत असल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही मतचोरी झाल्याचा दावा केला.

मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्ला यांचा घणाघात

पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही आम्हाला या देशाच्या समस्या बदलायच्या आहेत, आम्हाला देश बदलायचा आहे. जर तुम्ही आज बदल केला नाही, तर खूप उशीर होईल, असे आवाहन उपस्थितांना केले. आज आम्ही, जम्मू काश्मीरचे लोक उद्ध्वस्त झालो आहोत. आता सत्ताधारी पक्ष संपूर्ण देशाला जम्मू काश्मीर बनवणार नाहीत याची काळजी घ्या, असेही त्या म्हणाल्या. तर, आम्ही भारतासाठी आमचे रक्त दिले आहे आणि यापुढेही देत राहू. आम्हाला या देशात राहायचे आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले.

भाजप कारस्थानी : अखिलेश यादव

भाजप सतत कटकारस्थान करत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला.         ते लोकशाहीने जिंकू शकत नाहीत, म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. त्यांनी बंगालच्या निवडणुकीत गैरप्रकार केलेत. निवडणुकीपूर्वी एसआयआर अंमलबजावणी करून त्यांनी अनेकांचा मतदानाचा हक्क हिरावल्याचा दावाही अखिलेश यादव यांनी केला. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयुक्तांना तुरुंगात डांबले पाहिजे असे म्हटले आहे.

‘इंडिया’च्या रॅलीला भाजपचे प्रत्युत्तर

जे. पी. नड्डायांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर डागली तोफ

रामलीला मैदानावर झालेल्या इंडिया ब्लॉक रॅलीच्या निषेधार्थ भाजपने रविवारी दिल्लीसह देशभरात ‘लोकशाही वाचवा, अराजकता दूर करा’ मोर्चा आयोजित केला. दिल्लीत हरी नगर ते टिळक नगरपर्यंत सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा मोर्चा काढण्यात आला. 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांचे कुटुंबीय आणि शीख समुदायाचे सदस्य यात सहभागी झाले होते. शीखविरोधी हिंसाचाराचे ठिकाण असलेल्या रामलीला मैदानावर एसआयआरविरोधातील रॅलीसाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक 1 नोव्हेंबर ही तारीख निवडली, असा आरोप भाजपने केला. आज शीखविरोधी हिंसाचारातील पीडितांचे स्मरण करायला हवे होते, पण राहुल गांधी त्यांना विसरून रामलीला मैदानावर स्वत:चे राजकारण पुढे रेटत आहेत, असे केंद्रीय मंत्री जे. पी. न•ा म्हणाले.

भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी हरियाणातील रोहतक येथे रॅलीत सहभाग घेतला. मतचोरी हा काँग्रेसचा वारसा आहे. ते मते चोरतात आणि जनतेच्या मताचा अनादर करतात. राहुल गांधी परकीय शक्तींसाठी एक साधन म्हणून काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी परकीय शक्तींसाठी एक साधन म्हणून काम करत आहेत. विदेशी शक्तींच्या सांगण्यावरून त्यांना देशाच्या लोकशाहीला आव्हान द्यायचे आहे, असे नितीन नबीन म्हणाले. देशातील 140 कोटी जनतेला याची पूर्णपणे जाणीव असल्याचा दावाही त्यांनी केला.

नड्डा म्हणाले, ठराहुल परदेशात जाऊन भारताचा अपमान करतात.

सध्या सणासुदीचा काळ आहे. व्यापारी सणासुदीच्या दिवसांत थोडीफार अधिक कमाई करण्यासाठी वर्षभर वाट पाहतात, पण राहुल गांधींना त्यांची पर्वा नाही. सीटीआयने त्यांना चारवेळा पत्र लिहून एवढे मोठे आंदोलन न करण्याची विनंती केली होती. पण राहुल गांधींच्या या तमाशामुळे व्यापारीवर्गाला 10,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे, असा दावा जे. पी. न•ा यांनी केला. इंडिया आघाडीतील अन्य नेतेही या पापात भागीदार झाले आहेत. भाजपचा द्वेष करून तुम्ही देशातील लोकांचा द्वेष करायला लागला आहात का? राहुल परदेशात जाऊन भारताचा अपमान करतात. हाच तुमचा अजेंडा आहे का? असे प्रश्न विचारत भारतातील जनता तुमच्या या पोकळ धमक्यांना बळी पडणार नाही, असेही न•ा पुढे म्हणाले.

‘अभिरुप संसद’ हीच तुमची जागा : अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया अलायन्सने आयोजित केलेल्या रामलीला मैदान रॅली आणि अभिरुप संसदेवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. मला राहुल गांधींना सांगायचे आहे की, जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचे असेल, तर अशाच ‘मॉक पार्लमेंट’ म्हणजेच ‘अभिरुप संसद’ भरवत राहा. पंतप्रधान होण्याची तुमची वेळ कधीही येणार नाही, अशा शब्दात शाह यांनी राहुल गांधींना टोमणा मारला. आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात रविवारी पंजाबमधील चंदीगड येथे एका सभेला संबोधित करताना अमित शाह बोलत होते.

Comments are closed.