सप्टेंबरमध्ये 1.89 लाख कोटी जीएसटी जमा – TMarathiNews
गेल्यावर्षीच्या तुलनेत 9.1 टक्क्यांनी वाढ; ऑगस्टमधील संकलनापेक्षाही अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर केले आहेत. सप्टेंबरमध्ये वस्तू आणि सेवा करांमधून 1.89 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. हा आकडा मागील वार्षिक आधारावर 9.1 टक्क्यांनी वाढ दर्शवितो. तसेच यापूर्वीच्या म्हणजेच ऑगस्ट 2025 च्या तुलनेतही हे संकलन अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमधील संकलन 3,000 कोटींनी वाढले आहे.
अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये सरकारने जीएसटीमध्ये 1.73 लाख कोटी जमा केले होते. तर ऑगस्ट 2025 मध्ये 1.86 लाख कोटी रुपये इतके करसंकलन झाले होते. यापूर्वी, एप्रिल 2025 मध्ये विक्रमी 2.37 लाख कोटी आणि मे महिन्यात 2.01 लाख कोटी जमा झाल्याची नोंद आहे. आता चालू महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2025 मध्ये दसरा आणि दिवाळी या सणांमुळे मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची अपेक्षा असून जीएसटी संकलनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी, 22 सप्टेंबरपासून जीवनावश्यक वस्तूंवर फक्त 5 टक्के आणि 18 टक्के अशा दोन स्लॅबमध्ये जीएसटी लागू करण्यात आला होता. सरकारने करप्रणाली सोपी करण्यासाठी करप्रणालीत मोठे बदल करताना दूध, चीज, तूप, साबण आणि शाम्पू तसेच एसी आणि कार यासारख्या सामान्य गरजा स्वस्त केल्या आहेत. जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
जुलै महिन्यात देशात जीएसटी अंमलबजावणीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. 1 जुलै 2017 रोजी देशात जीएसटी लागू करण्यात आला. या कालावधीत, कर संकलनाच्या आकडेवारीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण जीएसटी संकलन 22.08 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हा आकडा पाच वर्षांपूर्वी 2020-21 मध्ये फक्त 11.37 लाख कोटी रुपये इतका होता. याचा अर्थ असा की पाच वर्षांत कर संकलन जवळजवळ दुप्पट झाले आहे. 2024-25 मध्ये सरासरी मासिक जीएसटी संकलन 1.84 लाख कोटी झाले असून पाच वर्षांपूर्वी 2020-21 मध्ये ते 95,000 कोटी इतकेच होते.
Comments are closed.