सी. पी. राधाकृष्णन देशाचे 15 वे उपराष्ट्रपती – TMarathiNews
राष्ट्रपतींनी दिली शपथ : पंतप्रधानांसह मान्यवरांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात पदाची शपथ घेतली. ते आता भारताचे 15 वे उपराष्ट्रपती झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी राधाकृष्णन यांनी इंग्रजी भाषेत देवाच्या नावाने शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व अन्य निमंत्रित सहभागी झाले होते. समारंभात उपस्थित असलेल्या नेते आणि पाहुण्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शपथविधी सोहळ्याप्रसंगी सी. पी. राधाकृष्णन यांनी लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यांच्या साधेपणा आणि सहज व्यक्तिमत्त्वाने समारंभ आणखी मनोरंजक बनवला. देशाने आपल्यावर दिलेली जबाबदारी आदर आणि जबाबदारीने पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमात माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेदेखील उपस्थित होते. राजीनाम्यानंतरचे हे त्यांचे पहिलेच सार्वजनिक दर्शन होते. त्यांच्या उपस्थितीमुळे समारंभाचे महत्त्व आणखी वाढले. प्रकृती अस्वास्थ्यानंतर धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ही उपराष्ट्रपती निवडणूक घ्यावी लागली.
राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ देशाच्या राजकारणात एक नवा अध्याय उघडेल. उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा अनुभव आणि साधेपणा संसदेचे कामकाज आणि लोकशाहीला बळकटी देईल, असे मानले जाते. आता सर्वांच्या नजरा त्यांच्या आगामी कारकिर्दीवर राहील.
67 वर्षीय सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रे•ाr यांचा पराभव केला. त्यांना 152 मतांचा मोठा विजय मिळाला. या विजयासह त्यांनी आपली राजकीय पकड आणि संघटनात्मक ताकदही सिद्ध केली. उपराष्ट्रपती म्हणून निवड होण्यापूर्वी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते. शपथविधीच्या फक्त एक दिवस आधी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. राज्यपालपदाच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राची जबाबदारी कोणाकडे सोपविली जाते हे पहावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन जबाबदारी कोणाला मिळणार याची चर्चा तीव्र झाली आहे. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केल्यानुसार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सध्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अर्थातच नवीन राज्यपाल नियुक्त होईपर्यंत देवव्रत महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळतील.
Comments are closed.