सौदीतील विमानोड्डाण बंदी 24 ऑक्टोबरपर्यंत वाढवली – TMarathiNews
प्रवाशांना रिफंडसह अन्य शहरांचा पर्याय : 15 ऑक्टोबरपर्यंत बुकिंग केलेल्यांना दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सौदी अरेबियातील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने जेद्दाह, रियाध आणि दम्माम या तीन प्रमुख शहरांमधून ये-जा करणाऱ्या विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. एअरलाईन्सने सोशल मीडियावर पुन्हा एकदा नव्याने यासंबंधी माहिती देताना ही बंदी 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू राहील, अशी घोषणा जारी केली आहे. या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना त्यांची तिकिटे पुन्हा शेड्यूल करण्याचा, पर्यायी विमानतळावरून प्रवास करण्याचा आणि परतावा मिळवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
जेद्दाह, रियाध आणि दम्मामच्या फ्लाइट्समुळे प्रभावित झालेले प्रवासी आखाती प्रदेशातील इतर शहरांमधून आपला प्रवास पुन्हा बुक करू शकतात. तथापि, ही सुविधा संबंधित एअरलाईनच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. एअर इंडियाने 15 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वीची तिकिटे कन्फर्म झालेल्या प्रवाशांना आणि त्यांच्या प्रवासाच्या तारखा 9 ते 25 ऑक्टोबर 2026 दरम्यान असलेल्यांना विशेष सवलत देण्याची तयारी दर्शवली आहे. सदर प्रवासी 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, संबंधित एअरलाईनकडे एकदा आपल्या प्रवासाच्या तारखा बदलू शकतात. ही सुविधा पात्र बुकिंगसाठी लागू होईल, असे एअरलाइनने म्हटले आहे. प्रवाशांच्या सेवेत होत असलेल्या व्यत्ययाबाबत एअरलाईनने दिलगिरी व्यक्त करताना प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
Comments are closed.