धक्कादायक! येऊरच्या जंगलात पाच महिन्यांत चार बिबट्यांची शिकार, प्रकरण दडपण्यासाठी वनाधिकाऱ्यांवर सरकारचा दबाव
ठाणे जिह्यातील येऊरच्या जंगलात शिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. गेल्या पाच महिन्यांत येऊरमध्ये चार बिबट्यांची शिकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिबट्यांना मारल्यानंतर शिकाऱ्यांनी त्यांची कातडी सोलून काढली. पायाचे पंजे कापले आणि दातही उपटले. या प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी सहा आरोपींना जेरबंद केले असून हे प्रकरण दडपण्यासाठी वनाधिकाऱ्यांवर सरकारकडून दबाव येत असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या रविवारी 29 मार्च रोजी डहाणूच्या भाताने येथील वनाधिकाऱ्यांनी बिबटय़ाची कातडी विकणाऱ्या दोन आरोपींना पकडले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आणखी चार आरोपी त्यांच्या हाती लागले. येऊरच्या जंगलात फासकीत अडकून मेलेल्या बिबटय़ाची ती कातडी असल्याचा दावा आरोपींनी केल्याने वनाधिकाऱ्यांचे पथक येऊरमध्ये पोहोचले. आरोपींकडून वनाधिकाऱ्यांनी बिबटय़ाची नखेही जप्त केली.
शनिवार 4 एप्रिल रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथील वनाधिकारी आणि डहाणू येथील भाताने परिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी आरोपींना घेऊन येऊरच्या जंगलाची तपासणी केली. त्या वेळी वनाधिकाऱ्यांना येऊरच्या हद्दीत घोडबंदर, चेना आणि काशी अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन बिबट्यांची हाडे, केस आणि शिकारीसाठी वापरण्यात आलेला तारेचा फास आढळला. गेल्या डिसेंबर महिन्यात मीरा-भाईंदरच्या नागरी वस्तीमध्ये घुसलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले होते. त्याला रेडिओ कॉलर लावून येऊरच्या जंगलात सोडण्यात आले होते. मात्र त्या बिबटय़ाचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. तो शिकारीचाच प्रकार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तारांचे फास लावून बिबट्यांची शिकार होणे हे गस्ती पथकांचे अपयश असल्याचे सांगितले जाते.
कार्यक्रम…
वन विभागाने पकडलेल्या सहा आरोपींमधील हर्षद चंदर जाधव या आरोपीने गेल्या डिसेंबर महिन्यात त्याला येऊरच्या जंगलात बिबटय़ाचा मृतदेह आढळल्याचे सांगितले. त्या मृत बिबटय़ाचे 2 दात काढून त्याने संतोष घोशे या दुसऱ्या आरोपीला विकण्यासाठी दिले होते.
संतोष घोशे याने गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर येऊरच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत बिबटय़ाचा मृतदेह आढळल्याचे सांगितले. त्या मृतदेहातून त्याने चार दात उपटून काढल्याची कबुली दिली आहे.
संतोष घोशे यानेच नंतरच्या डिसेंबर महिन्यातही येऊरच्या जंगलातील दुसऱ्या भागात फासकीत अडकून मेलेल्या बिबटय़ाची कातडी सोलून काढली आणि 6 दातही काढल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली आहे.
आरोपींनी दिलेल्या माहितीवरून वनाधिकाऱ्यांनी घोडबंदर येथील माशाचा पाडा या आदिवासी पाडय़ात दिनेश पागेरा याच्या घरावर धाड घातली. पागेरा याच्या घरात बिबटय़ाची कातडी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन सुऱ्या जप्त करण्यात आल्या.
Comments are closed.