छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करा! विधान परिषद सभागृहात विरोधकांचा ठिय्या

औरंगजेब क्रूर नव्हता, असे म्हणणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचा निषेध करत सरकारने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाहीर अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात सरकार कारवाई तर करत नाही, पण त्यांचे संरक्षण करत आहे. राहुल सोलापूरकर यांना तर पारितोषिक दिले जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱया महाराजांचा अपमान करणाऱया प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना तत्काळ अटक करा. सभागृहात याबाबत सविस्तर चर्चा झाली पाहिजे. तोपर्यंत हे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विधान परिषदेत सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभागृहातच ठिय्या आंदोलन केले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या तिसऱया दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेत 289द्वारे स्थगन प्रस्ताव मांडत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱया प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणी करत कामकाज रोखून धरले. विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधीही विरोधकांनी पायऱयांवर निषेध आंदोलन करत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱया कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराजांवर विशेष चर्चा होणार
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सतत होणाऱया विधानाबाबत विशेष चर्चा धडवून आणावी, अशी विनंती विरोधी पक्षनेते दानवे यांनी सभापतींकडे केली. सभापतींनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण करण्याची सूचना केली. या वेळी महाराजांच्या विषयावर विशेष चर्चा घडवून आणली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.
Comments are closed.