मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक; डीआरआयची धडक कारवाई, 5 कोटींचे सोने जप्त
मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तस्करीविरोधात मोठी कारवाई करत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचेरकर यांना अटक केली आहे. पहाटे करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर 6 जून रोजी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत आचेरकर यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान अधिकाऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात सोने आणि इतर साहित्य लागले असून, जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई झोनल युनिटला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मधील काही कर्मचारी आणि इतर व्यक्तींवर संशय होता. याच पार्श्वभूमीवर सापळा रचून रोहित सिंह, अजित आचेरकर आणि संतोष पोळ यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आले.
दोन श्रीलंकन आणि एक बांगलादेशी प्रवासी त्यांच्या शरीरात (रेक्टममध्ये) मेणामध्ये लपवून सोन्याची पावडर हिंदुस्थानात आणत असल्याचे उघड झाले आहे. चौकशीत त्यांनी सोन्याच्या तस्करीत सहभाग असल्याची कबुली दिली असून, जप्त केलेल्या सोन्याबाबत कोणतीही कायदेशीर मालकीची कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यांच्यावर कस्टम अॅक्ट 1962 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि जामीनपात्र नाही असे DRI ने नमूद केले आहे. हा तपास अद्याप सुरू असून आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेट, हवाला व्यवहार आणि इतर आरोपींचा शोध घेणे बाकी असल्याचे अर्जात म्हटले आहे. सर्व सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
अजित आचेरकर यांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाची राजकीय स्तरावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली असून, या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी होत आहे.
Comments are closed.