जाडेजाचं ‘पिवळ्या ‘जर्सी’वरचं प्रेम अजूनही कायम!
कधी काळी ज्या संघासाठी घाम गाळला, जिंकण्यासाठी जिवाचं रान केलं त्या संघापासून दूर जाणं किती कठीण असतं, याची जाणीव पुन्हा एकदा झाली. राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतरही रवींद्र जाडेजाच्या मनात मात्र चेन्नई सुपर किंग्जबद्दलचं प्रेम ओसंडून वाहताना दिसलं. सामन्यानंतर त्याने चेन्नईच्या लोगोला चुंबन देत जणू आपल्या जुन्या आठवणींना कवटाळलं आणि तो क्षण चाहत्यांसाठीही तितकाच हळवा ठरला.
जुने नाते, ताज्या भावना
सोमवारी गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा 8 विकेट्सनी पराभव केला, मात्र निकालापेक्षा जास्त चर्चा झाली ती रवींद्र जाडेजाच्या त्या एका भावनिक क्षणाची. सामन्यानंतर जाडेजाने खलील अहमदची भेट घेतली आणि त्याच्या जर्सीवरील चेन्नईच्या लोगोचे अलगद चुंबन घेतले. त्या कृतीतून त्याच्या मनातील जिव्हाळा स्पष्ट दिसून आला. ‘12-13 वर्षे एका संघासोबत घालवल्यानंतर वेगळं होणं सोपं नसतं,’ असे तो म्हणाला. त्या शब्दांत केवळ एक विधान नव्हतं, तर अनेक आठवणींचा ओघ दडलेला होता.
युनियन राजस्थान; मनात चेन्नई
रवींद्र जाडेजा ज्या राजस्थान संघातून आयपीएलमध्ये झळकला, त्याच संघात 17 वर्षांनंतर परतला आहे. ‘आता गुलाबी रंगही आवडू लागला आहे,’ असे तो हसत म्हणाला, पण त्याच्या डोळय़ांत ‘पिवळय़ा जर्सी’च्या आठवणी स्पष्ट दिसत होत्या. नव्या संघात नवी सुरुवात करताना तो सकारात्मक आहे, पण जुन्या नात्यांची ऊब अजूनही तितकीच जिवंत आहे.
या सामन्यात रवींद्र जाडेजाने आपल्या गोलंदाजीनेही ठसा उमटवला. एका षटकात त्याने शिवम दुबे आणि सरफराज खान यांना बाद करत संघाला मोठं यश मिळवून दिलं. दुबेचा बळी टिपल्यानंतरचं त्याचं ‘गन सेलिब्रेशन’ चर्चेत राहिलं, पण त्यानंतरचा भावनिक क्षण सर्वांच्या मनात घर करून गेला. राजस्थानने चेन्नईला 127 धावांत रोखत 12.1 षटकांत सहज विजय मिळवला, पण या सामन्याने क्रिकेटप्रेमींना एक गोष्ट पुन्हा आठवण करून दिली. खेळाडू संघ बदलू शकतो, पण मनात जपलेली नाती कधीच बदलत नाहीत.
Comments are closed.