डिसेंबर 2025 मध्ये 1.74 लाख कोटी जीएसटी जमा झाला.
गेल्यावर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी वाढ
जीएसटी संकलन
डिसेंबर 2024 1,64,556 कोटी रुपये
डिसेंबर 2025 1,74,550 कोटी रुपये
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
वर्षारंभी 1 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये भारताचे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 6.1 टक्क्यांनी वाढून 1,74,550 कोटी रुपये झाले. वर्षभरापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2024 मध्ये हे संकलन 1,64,556 कोटी रुपये इतके झाले होते. एप्रिल-डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण जीएसटी महसूल 16.50 लाख कोटी इतका झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत 15.19 लाख कोटी इतका जीएसटी जमा झाला होता.
मासिक संकलनात सीजीएसटीमध्ये 34,289 कोटी रुपये, एसजीएसटीमध्ये 41,368 कोटी रुपये आणि आयजीएसटीमध्ये 98,894 कोटींचा समावेश आहे. जीएसटी संकलनातील ही वाढ प्रामुख्याने आयात महसुलात 19.7 टक्क्यांच्या वाढीमुळे झाल्याचे दिसून येत आहे. आयात महसुलातील एकूण संकलन 51,977 कोटींचे आहे. डिसेंबर 2025 मध्ये एकूण देशांतर्गत जीएसटी महसूल 1.2 टक्क्यांनी वाढून 1.22 लाख कोटी रुपये झाला, तर आयातीवरील कर 19.7 टक्क्यांनी वाढून 51,977 कोटी रुपये झाला. जीएसटी रिफंड 30.9 टक्क्यांनी वाढून 28,980 कोटी रुपये झाल्याचे सांगण्यात आले. डिसेंबर 2025 मध्ये निव्वळ जीएसटी महसूल 1.45 लाख कोटी होता. हे संकलन मागील वर्षीच्या तुलनेत 2.2 टक्के अधिक आहे.
Comments are closed.