पूरग्रस्तांच्या मदतीला श्री गजानन महाराज संस्थान धावलं, 1 कोटी 11 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

महाराष्ट्रामध्ये पावसाचे धुमशान सुरू आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान कोसळत आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, नांदेड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, अहिल्यानगरमध्ये पावसाने हाहाकार उडवून दिला. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून घरं-दारं, जनावरं वाहून गेली आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदील झालेला असतानाच शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानकडून पूरग्रस्तांना 1 कोटी 11 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. श्री गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदतीचा धनादेश सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. पूरबाधितांना मदतीसाठी शासनाने आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-250 बुल) या न्यासाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी 11 लाखांचा सहयोग निधी देण्यात आला. हा धनादेश संस्थानच्या वतीने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 27 सप्टेंबर 2025 रोजी सुपूर्द करण्यात आला. संस्थानने केलेली ही मदत हे सेवा कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे मानले जात आहे.

Comments are closed.