वाहन दरीत कोसळल्याने 10 जवानांचा मृत्यू झाला.

11 जणांना केले एअरलिफ्ट : जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात दुर्घटना,लष्कराचे वाहन 400 फूट खोल दरीत पडले,जखमींवर उधमपूर येथील इस्पितळात उपचार

वृत्तसंस्था/दोडा

जम्मू काश्मीरच्या दोडा जिह्यात झालेल्या रस्ते अपघातात दहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला असून अन्य 11 जण जखमी झाले आहेत. भादरवाह-चंबा रस्त्यावरील खन्नी टॉपजवळ हा अपघात झाला. गुरुवारी सकाळी लष्कराचे पथक ऑपरेशनल ड्युटीसाठी निघाले असताना ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच लष्कर, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबविले. जखमी जवानांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना विशेष उपचारांसाठी विमानाने उधमपूर येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोडा जिल्ह्यातील खन्नी टॉपजवळ एका उंच आणि कठीण वळणावर, वाहनाचे नियंत्रण सुटल्यामुळे लष्करी जवानांना घेऊन जाणारे वाहन सुमारे 400 फूट खाली खोल दरीत पडले. एका अवघड वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. अपघातप्रसंगी वाहनात एकूण 21 सैनिक होते. या अपघातानंतर कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. बचावकार्यावेळी 10 सैनिक घटनास्थळीच मृतावस्थेत आढळले, तर 11 जण जखमी आढळले. जखमींना प्रथम भादरवाह येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून एअरलिफ्ट करून त्यांना उधमपूर येथे हलविण्यात आले. 11 जखमी सैनिकांना विमानाने रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमींवर सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत “दोडा येथील भीषण रस्ते अपघातात आपल्या दहा शूर सैनिकांनी प्राण गमावले.” असे म्हटले आहे. ‘दिवंगत जवानांची अनुकरणीय सेवा आणि सर्वोच्च बलिदान नेहमीच स्मरणात ठेवू. शोकग्रस्त कुटुंबांबद्दल माझी मनापासून संवेदना.’ असेही उपराज्यपालांनी पुढे सांगितले. या तीव्र दु:खद प्रसंगी संपूर्ण देश शोकग्रस्त कुटुंबांसोबत एकता आणि पाठिंब्यात उभा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभचिंतनही केले.

Comments are closed.