10 हजार ते 75 लाख महिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ

वृत्तसंस्था/ पाटणा (बिहार)

बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा समारंभपूर्वक शुभारंभ करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील 75 लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. बिहारमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना महत्वाची आहे.

या योजनेच्या अंतर्गत स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग प्रारंभ करणाऱ्या महिलांना 2 लाख रुपये दिले जाणार आहे या रकमेचा प्रथम हप्ता म्हणून ही रक्कम त्यांच्या नावे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या पैशातून महिला आपला नवा उद्योग स्थापन करु शकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन ऑन लाईन पद्धतीने करण्यात आले. या योजनेचा लक्षावधी महिलांना लाभ होणार असून त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पायावर उभे राहण्यासासाठी ही योजना साहाय्यभूत ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

एका परिवारातील एका महिलेलाच

या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच माहिलेला मिळणार आहे. ज्या महिला आजपर्यंत महिला स्वयंसाहाय्य योजनेशी जोडल्या गेलेल्या नाहीत, अशा गरीब महिलांना या योजनेला लाभ मिळू शकणार आहे. या अटींसह आणखी काही अटींचे पालन करणाऱ्या महिलांना ही योजना लाभदाक आहे.

Comments are closed.