कोकणच्या राजाची एपीएमसीत दमदार एण्ट्री, पहिल्या मोहोराच्या 100 पेट्या बाजारात
आंब्याचा बापूस म्हणून ओळख असलेल्या हापूसची नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आज दमदार एण्ट्री झाली. देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील बागांना आलेल्या पहिल्या मोहोराच्या १०० पेट्या एपीएमसीच्या फळ बाजारात डेरेदाखल झाल्या आणि व्यापाऱ्यांचा आनंद शिगेला पोहोचला. हा आंबा दीड ते अडीच हजार डझन या दराने विकला गेल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोकणातील हापूस आंब्याची पहिली पेटी जरी जानेवारी महिन्यात बाजारात आली असली तरी आंब्याचा हंगाम अद्याप सुरू झालेला नव्हता. गेल्या दहा दिवसांपासून बाजारात तुरळक पेट्या येत होत्या. मात्र कोकणातील आंब्याच्या पेट्यांची आवक थेट १०० वर पोहोचली. या हंगामात मोठ्या संख्येने पेट्या आज मार्केटमध्ये आल्याने व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी कोकण हापूसचे जोरदार स्वागत केले. हा आंबा पहिल्या मोहोराचा आहे. लांबलेला पाऊस आणि वाढलेल्या थंडीचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे. वातावरणातील या बदलाचा हापूसच्या पहिल्या मोहोराला जोरदार फटका बसल्याने पहिल्या मोहोराच्या आंब्याची आवक बाजारात कमी राहणार आहे. आज शंभर पेट्या बाजारात आल्यामुळे ग्राहकांची या पेट्यांवर अक्षरशः उड्या पडल्या. आकाराने लहान असलेला आंबा दीड हजार रुपये तर मोठ्या आकाराचा आंबा अडीच हजार रुपये डझन या दराने विकला गेला.
वातावरणातील बदलाचा उत्पादनावार परिणाम
वातावरणात झालेल्या बदलाचा कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनावर यंदा मोठा परिणाम झाला आहे. पाऊस लांबल्यामुळे आणि वाढलेल्या थंडीचा परिणाम आंब्याच्या पहिल्या मोहोरावर झाल्याने सध्या आवक कमी आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हापूसची आवक वाढणार असली तरी पूर्ण क्षमतेने हंगाम हा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.