‘घर’ जेव्हा सुरक्षित वाटेनासं होतं…तेव्हा महिलांच्या मनात नेमकं काय घडतं?

घर म्हणजे प्रत्येकासाठी सुरक्षितता, आधार आणि शांततेचं ठिकाण. पण जर एखाद्या महिलेला तिच्याच घरात भीती, असुरक्षितता किंवा अस्वस्थता जाणवू लागली, तर त्याचा परिणाम फक्त तिच्या मनावरच नाही, तर संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. घरगुती हिंसा, लैंगिक छळ, अत्याचार किंवा सततचा मानसिक दबाव अशा अनेक कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी महिलांच्या मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि त्याकडे वेळेत लक्ष देणं का गरजेचं आहे, हे जाणून घेऊयात.

सततची भीती
जेव्हा घरातच सुरक्षित वाटेनासं होतं, तेव्हा अनेक महिलांना सतत भीती, चिंता आणि अस्वस्थता जाणवू लागते. प्रत्येक गोष्टीबद्दल अनिश्चितता वाटू लागते. काही महिलांमध्ये अॅन्झायटी, डिप्रेशन, आत्मविश्वास कमी होणे आणि एकटेपणाची भावना वाढू शकते. अनेकदा महिलांना घडलेला अनुभव कुणाशी शेअर करण्याची भीती वाटते. “कोणी विश्वास ठेवेल का?”, “लोक काय म्हणतील?” किंवा “घरात आणखी वाद होतील” या विचारांमुळे त्या मनातील भावना दाबून ठेवतात. दीर्घकाळ भावना दडपून ठेवल्याने मानसिक ताण वाढत जातो.

शारीरिक आरोग्यावर परिणाम
मानसिक ताण केवळ मनापुरता मर्यादित राहत नाही. त्याचा शरीरावरही परिणाम दिसू लागतो. झोप न लागणे, सतत थकवा जाणवणे, डोकेदुखी, चिडचिड, भूक कमी-जास्त होणे, कामात लक्ष न लागणे अशा समस्या उद्भवू शकतात.

नातेसंबंधावर परिणाम
सतत मानसिक, भावनिक किंवा शारीरिक त्रास सहन करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यांना स्वतःचं मत व्यक्त करण्याची भीती वाटते. हळूहळू त्या लोकांपासून दूर राहू लागतात आणि सामाजिक आयुष्यापासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत शांत राहून सगळं सहन करणं हा उपाय नाही. विश्वासू कुटुंबीय, जवळचे मित्र, समुपदेशक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. वेळेत मिळालेली भावनिक आणि व्यावसायिक मदत परिस्थिती बदलण्यास मदत करू शकते.

महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी?
– आपल्या भावना मनात दडपून ठेवू नका.
– विश्वासू व्यक्तीशी मोकळेपणाने संवाद साधा.
– गरज वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्या.
– स्वतःच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्या.
– नियमित व्यायाम, ध्यान आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या.

Comments are closed.