ताजे मासे कसे ओळखावेत?
चिकन मटण खाणाऱ्यांच्या तुलनेत देशात मासे खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मासे आरोग्यासाठी उत्तम असतात. आवश्यक प्रथिने आणि चांगले फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणावर माश्यांमध्ये आढळून येतात. त्यामुळे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरसुद्धा दैनंदिन आहारात मासे खाण्याचा सल्ला देतात. पण मासे खरेदी करताना त्यांची गुणवत्ता जाणून घेणं फार आवश्यक आहे, कारण बऱ्याच मार्केटमध्ये शिळे किंवा निकृष्ट दर्जाचे मासे विकले जातात. fresh fish
मासे विकत घेताना नेहमी त्यांचे डोळे पाहावेत. ताज्या माशांचे डोळे चमकदार, टपोरे आणि पारदर्शक असतात. जर डोळे निस्तेज, पांढरे पडलेले किंवा खोल गेलेले असतील, तर तो मासा शिळा असू शकतो.
मासे घेताना त्यांचे कल्ले उघडून न बघणे ही मोठी चूक ठरू शकते. ताज्या माशांचे कल्ले हे गडद लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात. जर कल्ल्यांचा रंग फिकट, काळा किंवा राखाडी झाला असेल तर तो मासा बऱ्याच दिवसांपूर्वीचा असू शकतो.
ताज्या माशाचे मांस घट्ट असते. माशाच्या अंगावर बोट दाबल्यास तिथे खड्डा न पडता ते मांस लगेच पूर्वस्थितीत आले पाहिजे. जर मांस मऊ लागत असेल तर तो मासा शिळा झालेला असतो.
ताजा मासा असेल तर त्याला समुद्राच्या पाण्याचा किंवा पाण्याचा नैसर्गिक वास येतो. पण जर माशांमधून तीव्र, उग्र किंवा अमोनियासारखा दुर्गंधीयुक्त वास येत असेल तर ते मासे खराब झालेले असतात.
एक लक्षात घ्या आरोग्याशी तडजोड न करता नेहमी बर्फात व्यवस्थित ठेवलेले आणि विश्वासातील विक्रेत्याकडूनच मासे खरेदी करावेत.
हेही वाचा – नॉन-स्टिक ते प्लास्टिक…स्वयंपाकघरातील भांड्याचे आयुष्य किती?
Comments are closed.