महिनाभर फक्त सलाड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक महागडे डाएट फॉलो केले जातात. यामध्ये सध्या 30 दिवस फक्त सॅलड डाएटची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या डाएटमध्ये सलग अनेक दिवस फक्त फळे आणि कच्च्या भाज्यांचा सलाड खाल्ले जाते. पण, महिनाभर केवळ कच्च्या भाज्या आणि सलाडवर राहिल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो? पाहूयात सविस्तरपणे,

झपाट्याने वजन कमी होणे

सलाडमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सलग महिनाभर फक्त सलाड खाल्ल्यास शरीरातील कॅलरीचे प्रमाण घटते आणि सुरुवातीला वजन वेगाने कमी होते.

पचनक्रियेतील बदल

सलाडमधील फायबरमुळे पचनसंस्था सुरुवातीला सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. मात्र, अतिप्रमाणात कच्चे फायबर खाल्ल्याने काही दिवसांनी पोट फुगणे, गॅस होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

अशक्तपणा आणि थकवा

फक्त सलाड खाल्ल्याने शरीराला आवश्यक तेवढे प्रोटिन, निरोगी चरबी आणि कार्बोहायड्रेट्स मिळत नाहीत. यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी खालावते आणि सतत थकवा, अशक्तपणा जाणवतो.

स्नायूंचे नुकसान

प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीर चरबीसोबतच स्नायू वापरण्यास सुरुवात करते. यामुळे वजन कमी झाले तरी शरीर टोन न राहता सैल पडू शकते.

पोषक तत्वांची कमतरता

सतत कच्चे अन्न खाल्ल्याने व्हिटॅमिन B12, आयर्न आणि कॅल्शियमची गंभीर कमतरता निर्माण होऊ शकते. तसेच, यामुळे केस गळणे आणि त्वचेचा टवटवीतपणा कमी होणे अशा समस्या सुरू होतात.

तज्ज्ञ काय सांगतात?

सलाड हे आरोग्यासाठी नक्कीच उत्तम आहे, परंतु कोणत्याही एकाच अन्नावर महिनाभर राहणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणताही मोठा डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हेही वाचा – Gardening : वय वाढलं तरी मेंदू तल्लख ठेवायचा? गार्डनिंग ठरू शकते ब्रेन बूस्टर

Comments are closed.