Child Talent : पालकांनी मुलांमधीलं लपलेलं टॅलेंट कसं ओळखावं?
प्रत्येक मूल काही ना काही खास गुण घेऊन जन्माला येतं. मात्र प्रत्येक मुलाचं टॅलेंट अभ्यासातच असेल असं नाही. काही मुलांना चित्रकला आवडते, काहींना संगीत, काहींना खेळ, तर काहींना विज्ञान, तंत्रज्ञान किंवा कथाकथनाची आवड असते. अनेकदा पालक फक्त गुण आणि परीक्षांवर लक्ष केंद्रित करतात, त्यामुळे मुलांमधील नैसर्गिक कौशल्य दुर्लक्षित राहते. योग्य वेळी मुलांची आवड ओळखून त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. जाणून घेऊयात काही खास ट्रिक्स ज्या तुमच्या मुलांमधील टॅलेंट तुम्हाला ओळखायला मदत करतील. hidden talent in children
मुलं मोकळ्या वेळात काय करतात?
अभ्यास नसताना तुमचं मूल कोणत्या गोष्टींमध्ये रमून जातं, हे निरीक्षण करा. काही मुलं सतत चित्र काढतात, काही गाणी गुणगुणतात, काही लेगो किंवा पझल्स सोडवण्यात वेळ घालवतात, तर काही सतत मैदानात खेळायला धाव घेतात. यावरून त्यांच्या आवडीची दिशा लक्षात येऊ शकते.
त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका
काही मुलं सतत “हे का?”, “असं कसं?” असे प्रश्न विचारत असतात. ही केवळ उत्सुकता नसून शिकण्याची इच्छा असते. मुलं कोणत्या विषयांबद्दल जास्त प्रश्न विचारतात, यावरून त्यांची आवड आणि भविष्यातील कौशल्यांची कल्पना येऊ शकते.
मुलं कोणते खेळ निवडतात, याकडे लक्ष द्या
– सतत ब्लॉक्स किंवा लेगो लावणारी मुलं डिझाइन किंवा इंजिनिअरिंगकडे वळू शकतात.
– गोष्टी सांगणारी मुलं लेखन किंवा अभिनयात चांगली असू शकतात.
– गाड्या, रोबोट किंवा मशीनमध्ये रस असलेली मुलं तंत्रज्ञानाकडे आकर्षित होऊ शकतात.
गुणांवरून मूल्यांकन करू नका
कमी गुण म्हणजे मूल हुशार नाही, असा अर्थ होत नाही. प्रत्येक मुलाची शिकण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. अभ्यासाबरोबरच त्यांची सर्जनशीलता, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि कलेलाही तितकंच महत्त्व द्या.
वेगवेगळ्या उपक्रमांचा अनुभव द्या
मुलांना चित्रकला, संगीत, नृत्य, क्रीडा, नाट्य, रोबोटिक्स, कोडिंग, वाचन, बागकाम किंवा हस्तकला अशा विविध उपक्रमांचा अनुभव घेऊ द्या. प्रत्येक गोष्ट करून पाहिल्यानंतरच त्यांना काय आवडतं हे स्पष्ट होतं.
शिक्षकांशी संवाद
शाळेत मुलं कशी वागतात, कोणत्या विषयात किंवा उपक्रमात उत्साह दाखवतात, याची माहिती शिक्षकांकडून मिळू शकते. अनेकदा पालकांच्या लक्षात न आलेली मुलांची ताकद शिक्षक सहज ओळखू शकतात.
स्वतःची स्वप्नं लादू नका
पालकांची अपूर्ण स्वप्नं मुलांनी पूर्ण करावीत, असा आग्रह टाळा. मुलाला ज्या क्षेत्रात आनंद मिळतो, त्याच क्षेत्रात तो अधिक चांगली कामगिरी करू शकतो.
प्रयत्नांचं कौतुक करा
मुलांनी एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांचं कौतुक करा. सतत टीका केल्यास त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
प्रत्येक मूल वेगळं असतं. काहींचं टॅलेंट लहान वयात दिसून येतं, तर काहींना स्वतःची आवड शोधण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे तुलना करण्याऐवजी मुलांना योग्य वातावरण, प्रोत्साहन आणि संयम द्या.
Comments are closed.