Teen-Ternity : किशोरवयीन मुलांसाठी पालक स्वीकारतायत ‘टीन-टर्निटी’ ट्रेंड
मुलं लहान असताना त्यांना आई-वडिलांची गरज असते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण अनेकदा मुलं मोठी झाली की त्यांना पालकांच्या सहवासाची गरज कमी होते, असा समज केला जातो. प्रत्यक्षात मात्र किशोरवय हेच आयुष्यातील सर्वात संवेदनशील टप्प्यांपैकी एक मानले जाते. याच काळात मुलांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक आयुष्यात मोठे बदल घडत असतात. त्यामुळेच सध्या जगभरात ‘टीन-टर्निटी’ (Teen-Ternity) हा नवीन पॅरेंटिंग ट्रेंड चर्चेत आला आहे. चला तर जाणून घेऊया, नेमकं काय आहे हा ट्रेंड आणि काही पालक तो का स्वीकारत आहेत.
काय आहे ‘टीन-टर्निटी’ ट्रेंड?
‘टीन-टर्निटी’ हा शब्द Teen (किशोरवय) आणि Maternity (मातृत्व) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. हा एक पॅरेंटिंग दृष्टिकोन आहे. यामध्ये काही पालक किशोरवयीन मुलांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी स्वतःहून कामाचे तास कमी करतात, वर्क फ्रॉम होम किंवा फ्लेक्सिबल जॉब निवडतात किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेतात.
सध्याच्या काळात किशोरवयीन मुलांवर अभ्यास, करिअर, सोशल मीडिया, मित्रपरिवार, स्पर्धा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा मोठा ताण असतो. या काळात त्यांना फक्त आर्थिक आधार नव्हे, तर भावनिक आधाराचीही तितकीच गरज असते. मुलं अनेकदा आपल्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत. त्यामुळे पालकांचा वेळ, संवाद आणि उपस्थिती त्यांच्यासाठी खूप महत्वाची ठरते.
पालकांची भूमिका
या वयात मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल वेगाने घडत असतात. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते चुकीच्या संगतीत जाणे, सोशल मीडियाचा अतिरेक, आत्मविश्वास कमी होणे किंवा मानसिक तणाव अशा समस्यांना सामोरे जाऊ शकतात. जर पालक त्यांच्यासाठी उपलब्ध असतील, तर मुलं मनातील गोष्टी सहजपणे शेअर करतात आणि निर्णय घेताना त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
‘टीन-टर्निटी’ म्हणजे करिअर सोडणे?
या ट्रेंडचा अर्थ नोकरी सोडणे असा अजिबात नाही. प्रत्येक पालकासाठी हे शक्यही नसते. मात्र, दिवसातून थोडा वेळ मुलांसाठी राखून ठेवणे, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे, त्यांच्या मित्रपरिवाराबद्दल जाणून घेणे आणि त्यांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे, हाच या ट्रेंडचा मुख्य उद्देश आहे.
Comments are closed.