रात्री तासन्तास झोप येत नाही? ट्राय करा ‘मिलिटरी स्लीप मेथड’
दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री अंथरुणावर पडल्यावरही अनेकांना झोप लागत नाही. मोबाईल स्क्रोल करणे, कामाचा ताण, भविष्याची चिंता किंवा सतत सुरू असलेले विचार यामुळे झोपेचा दर्जा खालावतो. आणि अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड जाणवू लागते. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर आणि आरोग्यविषयक चर्चांमध्ये ‘मिलिटरी स्लीप मेथड’ ही पद्धत मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. नियमित सराव केल्यास कमी वेळात झोप लागण्यास ही पद्धत मदत करू शकते, असा दावा केला जातो. military sleep method in marathi
काय आहे ‘मिलिटरी स्लीप मेथड’?
ही एक रिलॅक्सेशन टेक्निक आहे. शरीरातील ताण कमी करून मन शांत करण्यावर या पद्धतीचा भर असतो. असे मानले जाते की, ही पद्धत अमेरिकन लष्करातील वैमानिकांना कमी वेळेत झोप लागावी आणि कठीण परिस्थितीतही पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी विकसित करण्यात आली होती.
ही पद्धत कशी काम करते?
झोप येण्यासाठी केवळ डोळे मिटणे पुरेसे नसते. शरीर आणि मेंदू दोन्ही शांत होणे आवश्यक असते. ‘मिलिटरी स्लीप मेथड’मध्ये स्नायूंमधील ताण टप्प्याटप्प्याने कमी केला जातो आणि मनाला शांत करण्यावर भर दिला जातो.
ही पद्धत करून पाहायची असेल तर…
आरामदायी स्थितीत झोपा आणि डोळे बंद करा.
– सर्वप्रथम चेहरा, जबडा आणि डोळ्यांभोवतीचे स्नायू पूर्णपणे सैल सोडा.
– त्यानंतर खांदे, हात आणि तळहात रिलॅक्स करा.
– खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा.
– छाती, पोट, मांड्या आणि पायांमधील ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा.
– शेवटी स्वतःला एखाद्या शांत समुद्रकिनारी, हिरव्यागार डोंगरांमध्ये किंवा निवांत जागी असल्याची कल्पना करा.
– मनात इतर विचार आले तर पुन्हा त्या शांत दृश्यावर लक्ष केंद्रित करा.
प्रत्येक व्यक्तीची झोपेची पद्धत वेगळी असते. त्यामुळे ही टेक्निक वापरून लगेचच दोन मिनिटांत झोप लागेल, याची खात्री देता येत नाही. मात्र नियमित सराव केल्यास अनेकांना शरीर रिलॅक्स होण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.
Comments are closed.