घरातून बाहेर पडताना ‘हे’ विसरणं म्हणजे आपली रोजची सवय; तुम्हीही करता या चुका?
“चला, निघतो!” असं म्हणत आपण घराबाहेर पडतो दोन पावलं चालतो आणि अचानक थांबतो. अरे! मोबाईल घेतलाय ना? खिशाला हात जातो. मोबाईल असतो. मग दुसरा विचार पाकीट? तेही असतं. पण पुढच्याच क्षणी डोक्यात प्रश्न येतो, गॅस बंद केला होता का? आणि मग सुरू होते उलट्या पावलांची वाटचाल.
घरातून बाहेर पडताना आपण कितीही घाईत असलो, तरी काही ना काही वस्तू विसरणं हा अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे. विशेष म्हणजे काही वस्तू आपण घराबाहेर पडल्यानंतरच आठवतात. मग पुन्हा घरात जाणं, वस्तू शोधणं आणि शेवटी आजपासून सगळं आधीच तपासायचं असा निर्धार आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेच.
मोबाईल आहे, पण चार्जर कुठे?
मोबाईलशिवाय घराबाहेर पडणं हल्ली जवळजवळ अशक्यच. त्यामुळे मोबाईल विसरला की लगेच लक्षात येतो. पण चार्जर, पॉवर बँक किंवा इअरफोनचं काय? विशेषतः प्रवासाला निघताना सगळं घेतलंय असं वाटतं आणि गाडी सुरू झाल्यानंतर आठवतं चार्जर विसरलोच.
पाकीट घेतलं, पण कार्ड?
काही जण रोख पैसे विसरतात, तर काही जण पाकीटच घरी ठेवतात. आता UPI मुळे रोख पैशांची गरज कमी झाली असली तरी ओळखपत्र, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑफिसचा ID विसरण्याची वेळ अनेकांवर येते.
छत्रीची आठवण उशिराच का?
पावसाळ्यातली सर्वात कॉमन विसरलेली वस्तू म्हणजे छत्री. आकाशात ढग दिसले की छत्री घेण्याचा विचार होतो. पण निघायच्या घाईत विसरतो आणि बाहेर पडतो. पाच मिनिटांनी पाऊस सुरू झाला की मग छत्रीची किंमत कळते.
गॅस बंद केला ना?
ही वस्तू विसरण्यापेक्षा विसरल्याची शंका अधिक त्रास देते.घरापासून थोडं पुढे गेल्यावर अचानक मनात विचार येतो गॅस खरंच बंद केला होता का? मग आठवण्याचा प्रयत्न सुरू होतो. “मी शेवटी काय केलं होतं?” काही केल्या आठवत नाही. शेवटी खात्री करण्यासाठी पुन्हा घराकडे वळावं लागतं.
घराची चावी
मोबाईल, पाकीट, बॅग सगळं घेतलं पण चावी कुठे? दार बंद करून खाली आल्यानंतर चावी खिशात आहे की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा हात खिशात जातो. काही वेळा चावी सापडत नाही आणि दोन मिनिटांचा शोधमोहीम सुरू होते. आणि चावी सापडल्यानंतर लक्षात येतं ती तर दुसऱ्याच खिशात होती.
हे सगळं विसरतोच का आपण?
यामागे अनेकदा घाई, लक्ष विचलित होणं आणि एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करणं ही कारणं असतात. आपण घरातून बाहेर पडताना मनात आधीच ऑफिस, ट्रॅफिक, मुलांची शाळा, मीटिंग, बाजार, फोन कॉल अशा अनेक गोष्टींचा विचार करत असतो. त्यामुळे हातात काय घेतलं आणि काय राहिलं, याकडे पुरेसं लक्ष जात नाही. यासाठी बाहेर पडण्यापूर्वी फक्त काही सेकंदांची ‘डोअर चेक’ सवय उपयोगी ठरू शकते.
बाहेर पडण्यापूर्वी 10 सेकंदांचा चेक
मोबाईल
पाकीट
चावी
ओळखपत्र/कार्ड
पाण्याची बाटली
छत्री/सनग्लासेस
गॅस/लाईट/इतर आवश्यक गोष्टी
ही छोटी सवय लावली तर पुन्हा घरात जाण्याची वेळ कमी होऊ शकते.
Comments are closed.