फ्रिजमध्ये ठेवलेल्या या वस्तूंची चव का बदलते?

कालच केलेली भाजी आज फ्रिजमधून बाहेर काढली की तिची चव थोडी वेगळी का लागते? दूधाला कांद्याचा वास, बटरला मसाल्याचा फ्लेवर किंवा फळांना एखाद्या उघड्या डब्यातील पदार्थाचा वास येतो, असा अनुभव अनेकांना येतो. पदार्थ खराब झालेला नसतो, तरी त्याची मूळ चव आणि सुगंध मात्र बदललेला जाणवतो. यामागे फ्रिजमधील हवा, ओलावा आणि पदार्थांची चुकीची साठवणूक ही प्रमुख कारणे असू शकतात.

वास चवीत उतरतो
फ्रिजमध्ये हवा सतत फिरत असते. त्यामुळे कांदा, लसूण, लोणचे, मासे, मसालेदार भाजी किंवा उरलेले पदार्थ यांचा वास इतर पदार्थांपर्यंत पोहोचतो. विशेषतः उघडे ठेवलेले दूध, बटर, कापलेली फळे, मिठाई किंवा शिजवलेले पदार्थ हे आसपासचे वास सहज शोषून घेतात. त्यामुळे पदार्थ ताजा असूनही त्याची चव वेगळी वाटू शकते.

ओलाव्याचा परिणाम
फ्रिजमध्ये गरम पदार्थ तसेच उघडे पदार्थ ठेवल्यास ओलावा वाढतो. त्यामुळे काही भाज्या मऊ पडतात, तर काही पदार्थांची चव आणि पोत बदलतो. म्हणून शिजवलेले पदार्थ पूर्णपणे उघडे न ठेवता योग्य झाकणाच्या डब्यात ठेवणे गरजेचे आहे

‘हे’ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये
टोमॅटो, बटाटे, कांदे, लसूण आणि काही उष्णकटिबंधीय फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव किंवा पोत बिघडू शकतो. विशेषतः केळी, आंबा आणि पपई यांसारखी फळे पिकण्याआधी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांची नैसर्गिक चव कमी होऊ शकते.

चव टिकवण्यासाठी…
फ्रिजमध्ये प्रत्येक पदार्थ झाकून ठेवा, तीव्र वासाचे पदार्थ वेगळे ठेवा आणि उरलेले अन्न वेळेवर वापरा. फ्रिज खूप भरून ठेवू नका, कारण योग्य हवा खेळती राहणेही महत्त्वाचे आहे. अशा छोट्या सवयींमुळे पदार्थांची मूळ चव, सुगंध आणि ताजेपणा अधिक काळ टिकवता येतो.

Comments are closed.