Morning Routine: गृहिणींसाठी स्मार्ट मॉर्निंग रुटीन




गृहिणींसाठी वेळेचे नियोजन


सकाळचे सात वाजलेले असतात घरातल्यांसाठी नाश्ता तर कोणासाठी डबा तयार करायचा असतो, मुलांना शाळेसाठी उठवायचे असते, नवऱ्याची ऑफिसची तयारी सुरू असते आणि त्याचवेळी इतर घरातली कामं आणि बरंच काही सकाळ सकाळ सुरु असतं. या सगळ्या गडबडीत स्वतःसाठी दोन मिनिटे काढणेही अनेक गृहिणींना कठीण जाते. पण सकाळच्या कामांचा योग्य क्रम ठरवला तर हीच धावपळ थोडी कमी करता येऊ शकते. त्यासाठी जाणून घेऊयात काही स्मार्ट मॉर्निंग रुटीन टिप्स.

1) स्वतःची तयारी
उठल्याबरोबर थेट कामाला लागण्याऐवजी काही मिनिटे स्वतःसाठी द्या. पाणी प्या, फ्रेश व्हा आणि दिवसात करायच्या महत्त्वाच्या कामांचा मनात आढावा घ्या. यामुळे दिवसभरात काय करायचे आहे याचा अंदाज येतो.

2) किचनला द्या पहिला नंबर
चहा, नाश्ता आणि डबे हे सकाळच्या वेळेतील सर्वात महत्त्वाचे काम. नाश्त्याची आणि डब्याची शक्य तितकी तयारी आदल्या रात्री करून ठेवली तर सकाळची घाई कमी होते. नाश्ता झाल्यावर भांडी लगेच पाण्यात भिजत ठेवल्यास नंतर स्वच्छ करणे सोपे जाते.

3) आवरा आवर
घरातील प्रत्येक खोली एकाच वेळी साफ करण्यापेक्षा रोजच्या वापरातील जागांना प्राधान्य द्या. बेडरूम आणि बाथरूमची स्वच्छता करा ज्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. बेड नीट करणे, कपडे जागेवर ठेवणे, बाथरू स्वच्छ करणे बेसिन आणि आरसा पटकन पुसणे एवढी छोटी कामेही घराला नीटनेटके ठेवतात.

4) घरातल्यांचा हातभार
घरातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवण्याची सवय लावली तर गृहिणींचा बराच वेळ वाचतो. मुलांनी स्वतःची शाळेची बॅग आणि बूट जागेवर ठेवणे, मोठ्यांनी आपले कपडे आणि कप-ताट स्वतः हाताळणे अशा छोट्या जबाबदाऱ्या घरातील कामाचे ओझे कमी करू शकतात.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सकाळची वेळ पूर्णपणे घरकामात घालवू नका. दहा-पंधरा मिनिटे शांतपणे चहा पिणे, थोडे चालणे किंवा निवांत बसणेही तितकेच महत्त्वाचे आहे. घर सांभाळताना स्वतःला वेळ देणे देखील महत्वाचे आहे.



Comments are closed.