उरलेला प्रसाद फ्रिजमध्ये ठेवताना टाळाव्यात या चुका
दीड, पाच, गौरी गणपतींचे विसर्जन झाले असले तरी अनंत चतुर्दशीपर्यंत घरांघरात विराजमान होणारा बाप्पा भक्तांच्या घरी त्याचे लाड करून घेत आहे. सण-उत्सव म्हटलं की घरात विविध प्रकारचे पदार्थ आणि प्रसाद बनवला जातो. मोदक, लाडू, खीर, श्रीखंड, पुरणपोळी यांसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. मात्र, प्रसाद किंवा गोड पदार्थ उरल्यावर तो थेट फ्रिजमध्ये ठेवताना काही चुका केल्यास तो लवकर खराब होऊ शकतो. अशा पदार्थांचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आज आपण उरलेला प्रसाद फ्रिजमध्ये ठेवताना कोणत्या चुका करणे टाळायचे आहे हे पाहूयात
गरम पदार्थ लगेच फ्रिजमध्ये ठेवू नये
प्रसाद किंवा शिजवलेला पदार्थ खूप गरम असताना थेट फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. तो आधी काही वेळ थंड होऊ द्यावा. मात्र, पदार्थ बराच वेळ खोलीच्या तापमानावर ठेवणेही योग्य नाही.
उघडाच पदार्थ ठेवू नये
उरलेला प्रसाद ताटात किंवा उघड्या भांड्यात ठेवण्याऐवजी स्वच्छ, झाकण असलेल्या डब्यात ठेवावा. यामुळे पदार्थाचा इतर खाद्यपदार्थांशी संपर्क कमी होतो आणि वासही मिसळत नाही.
खीर, श्रीखंडासारख्या पदार्थांची काळजी
दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे असे पदार्थ शक्य तितक्या लवकर थंड करून फ्रिजमध्ये ठेवणे गरजेचे आहे.
जुना पदार्थ पुन्हा पुन्हा बाहेर काढू नये
जेवढा पदार्थ खायचा आहे तेवढाच बाहेर काढावा. संपूर्ण डबा वारंवार बाहेर काढून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे.
हे महत्त्वाचे –
तसेच पदार्थाचा रंग, वास किंवा चव बदललेली दिसत असेल तर तो खाणे टाळावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना असा पदार्थ देऊ नये.
हेही वाचा – स्वयंपाकघरात काम करता करताच व्हा फिट; महिलांसाठी सोपे व्यायाम
Comments are closed.