Morning Routine: सकाळी उठल्यावर पहिल्या 30 मिनिटांत काय करावे?
सकाळी अलार्म बंद केल्यानंतर आपण उठतो खरे, पण त्यानंतर हात आपोआप मोबाईलकडे जातो. WhatsApp, Instagram, ई-मेल किंवा अपडेट्स पाहण्यात काही मिनिटे कधी निघून जातात हे कळतही नाही. त्याऐवजी सकाळची सुरुवातीची 30 मिनिटे थोडी शिस्तबद्ध पद्धतीने वापरली, तर दिवस अधिक व्यवस्थित सुरू करण्यास मदत होऊ शकते. यासाठी खूप मोठी किंवा कठीण रुटीन करण्याची गरज नाही.
1. मोबाईल नको
अलार्म बंद केल्यानंतर लगेच सोशल मीडिया किंवा कामाचे मेसेज तपासण्याऐवजी काही मिनिटे स्वतःसाठी ठेवा. दिवसाची सुरुवात इतरांच्या अपडेट्सने करण्यापेक्षा शांतपणे जागे होणे आणि मन स्थिर करण्यासाठी वेळ देणे अधिक उपयोगी ठरू शकते.
2. पाणी प्या
रात्रभर पाणी न घेतल्यामुळे सकाळी शरीराला द्रवाची गरज असू शकते. त्यामुळे उठल्यानंतर साधे पाणी पिण्याची सवय लावू शकता. मात्र सकाळी पाणी पिण्यासाठी कोणताही ठरावीक ‘डिटॉक्स’ पदार्थ घेणे आवश्यक नाही.
3. नैसर्गिक प्रकाश घ्या
उठल्यानंतर खिडकीचे पडदे उघडून नैसर्गिक प्रकाशात काही वेळ राहा. सकाळचा प्रकाश शरीराच्या झोप-जागेपणाच्या नैसर्गिक चक्राशी संबंधित असतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात घरातील कृत्रिम प्रकाशाऐवजी नैसर्गिक प्रकाशाने करणे चांगली सवय ठरू शकते.
4. हलकी हालचाल
सकाळी लगेच कठीण वर्कआउट करण्याची गरज नाही. 5 ते 10 मिनिटे हलके स्ट्रेचिंग, घरात चालणे किंवा सोपे मोबिलिटी एक्सरसाइज करता येतील. विशेषतः बराच वेळ बसून काम करणाऱ्यांसाठी शरीराची हालचाल करून दिवस सुरू करणे उपयोगी ठरू शकते.
5. महत्वाची कामे
सकाळी मोठी To-Do List बनवण्याऐवजी आज पूर्ण करायची फक्त तीन महत्त्वाची कामे लिहा. यामुळे दिवसभर कोणत्या कामाला आधी वेळ द्यायचा हे स्पष्ट राहते आणि अनावश्यक गोंधळ कमी करण्यास मदत होते.
6. स्वतःला वेळ द्या
पहिल्या 30 मिनिटांत सतत फोन, न्यूज किंवा सोशल मीडिया पाहण्याऐवजी काही मिनिटे शांत बसणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे किंवा आवडते पुस्तक वाचणे यासाठी देता येतील. सकाळचा हा छोटा ‘Me Time’ दिवसाची सुरुवात घाईगडबडीऐवजी शांतपणे करण्यास मदत करू शकतो.
सकाळची चांगली सुरुवात म्हणजे एखादी परफेक्ट रुटीन फॉलो करणे नव्हे. उलट, रोज सहजपणे करता येतील अशा छोट्या सवयी तयार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्यापासून उठल्यावर लगेच मोबाईल उघडण्याऐवजी पाणी, प्रकाश, हालचाल आणि दिवसाचे नियोजन या चार गोष्टींनी तुमच्या सकाळीची सुरुवात करून पाहा.
Comments are closed.