विकेंडला जास्त झोपता? मग ‘हे’ गणित जाणून घ्या
आठवडाभर कामाची धावपळ, ऑफिस, घरातील जबाबदाऱ्या आणि अपुरी झोप यामुळे अनेकजण शनिवार-रविवार उशिरापर्यंत झोपून राहतात. सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपल्याने आठवडाभराचा थकवा दूर होईल, असं अनेकांना वाटतं. पण विकेंडला घेतलेली अतिरिक्त झोप शरीरासाठी किती फायदेशीर असते? तसेच, आठवड्याभरातील झोपेची कमतरता विकेंडला भरून काढता येते का? हे समजून घेणं महत्वाचं आहे.
किती झोप आवश्यक?
बहुतेक प्रौढ व्यक्तींना दररोज साधारण 7 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. मात्र, कामाच्या व्यापामुळे अनेकजण रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. परिणामी, त्यांच्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. दररोज आवश्यकतेपेक्षा कमी झोप घेतल्यास झोपेची कमतरता म्हणजेच ‘स्लीप डेफिसिट’ निर्माण होऊ शकते.
विकेंडला जास्त झोपल्यास…
समजा, तुम्हाला दररोज 8 तास झोपेची गरज आहे पण तुम्ही पाच दिवस फक्त 6 तास झोपता. म्हणजेच, दररोज 2 तासांची झोप कमी होते. पाच दिवसांत ही कमतरता 10 तासांपर्यंत पोहोचते. विकेंडला जास्त झोपल्याने थकवा काही प्रमाणात कमी होऊ शकतो आणि सतर्कतेत सुधारणा होऊ शकते. मात्र, संपूर्ण आठवड्याची झोपेची कमतरता एकाच वेळी भरून निघेलंच असं नाही.
विकेंडला किती वेळ झोपावं?
विकेंडला शरीराला विश्रांती देणं चुकीचं नाही. मात्र, रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा अनेक तास उशिरा उठल्यास शरीराचं नैसर्गिक झोपेचं चक्र बिघडू शकतं. त्यामुळे शनिवार-रविवारीही झोपण्याची आणि उठण्याची वेळ शक्यतो नियमित ठेवा. गरज असल्यास थोडी अतिरिक्त झोप घ्या पण त्यासाठी रात्रीची झोप सतत पुढे ढकलू नका.
चांगल्या झोपेसाठी टिप्स
दररोज ठरावीक वेळी झोपण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा, संध्याकाळनंतर कॅफीनचं सेवन टाळा आणि झोपण्याची खोली शांत ठेवा. पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा जाणवत असेल किंवा दिवसा वारंवार झोप येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Comments are closed.