वाढत्या वयासोबत का बदलतो ज्येष्ठांचा स्वभाव?
घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा स्वभाव अचानक बदलल्याचे तुम्ही कधी अनुभवले आहे का? पूर्वी शांत असणाऱ्या व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड करू लागतात, तर काही जण एकटं राहणं पसंत करतात किंवा सतत काळजी करताना दिसतात. वय वाढताना शरीरात होणारे बदल, झोपेचा अभाव, एकटेपणा, ताणतणाव किंवा काही आरोग्यविषयक समस्या यांचा त्यांच्या वागण्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, स्वभावातील बदलांकडे केवळ वाढत्या वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करणं योग्य नाही. वडिलधाऱ्या व्यक्तींच्या वागण्यात अचानक बदल होण्यामागे नेमकी कोणती कारणे असू शकतात आणि अशा वेळी कुटुंबीयांनी काय करावे? हे समजून घेऊयात.
भावनिक आधाराचा अभाव
वय वाढल्यानंतर मित्रपरिवार कमी होणं, जोडीदाराचं निधन किंवा मुलांचे कामानिमित्त दूर राहणं यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना एकटेपणा जाणवू शकतो. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कोणी नसल्यास चिडचिड किंवा अबोला वाढण्यास सुरूवात होते.
शारीरिक आघात
विविध प्रकारचे शारीरिक त्रास यांचा मनःस्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पूर्वी शांत असलेली व्यक्तीही लहानसहान गोष्टींवर नाराज होऊ शकते किंवा चिडचिड करू शकते.
औषधांचा परिणाम
काही औषधांमुळे वागण्यात बदल होऊ शकतात. थायरॉईडमधील बिघाड, संसर्ग किंवा इतर वैद्यकीय समस्याही यामागे असू शकतात.
कुटुंबीयांनी काय करावे?
ज्येष्ठ व्यक्तींशी शांतपणे संवाद साधावा, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि त्यांना घरातील आणि रोजच्या निर्णयामध्ये सहभागी करून घ्यावं. स्वभावातील बदल अचानक झाला असेल किंवा सतत जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या वागण्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
हेही वाचा – झोपण्याची योग्य पोझिशन कोणती? पाठ, कुशी की पोटावर?
Comments are closed.