कपड्यांच्या टॅगवरील ‘या’ चिन्हांचा अर्थ काय?
नवीन कपडे खरेदी केले की त्यांचा रंग, डिझाइन, फिटिंग आणि किंमत याकडे आपलं सर्वाधिक लक्ष जातं. पण कपड्याच्या आत असलेल्या छोट्याशा टॅगकडे किती जण लक्ष देतात? या टॅगवर बादली, त्रिकोण, इस्त्री किंवा गोल अशा आकारांची काही चिन्हं दिसतात. अनेक जण ही चिन्हं दुर्लक्षित करून कपडे थेट वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. मात्र, या छोट्या चिन्हांमध्ये कपड्यांची योग्य काळजी घेण्याची महत्त्वाची माहिती दडलेली असते. त्यामुळे कपड्यांच्या टॅगवरील चिन्हांचा अर्थ समजून घेणं प्रत्येकासाठी उपयोगाचं ठरू शकतं.
1) बादलीचे चिन्हं
कपड्यांच्या टॅगवर पाण्याने भरलेल्या बादलीसारखं चिन्ह दिसत असेल, तर ते कपडे धुण्याशी संबंधित असतं. या चिन्हातील आकडा किंवा तापमानाची खूण कपडे धुण्यासाठी योग्य असलेलं कमाल पाण्याचं तापमान दर्शवते. बादलीच्या खाली एक किंवा दोन आडव्या रेषा असल्यास कपडे अधिक सौम्य पद्धतीने धुण्याची गरज असू शकते. बादलीवर क्रॉस असेल, तर ते कपडे पाण्यात धुणे टाळावे.
2) त्रिकोणी चिन्ह
त्रिकोण हे चिन्ह कपडे ब्लीच करता येतील की नाही, हे सांगते. रिकामा त्रिकोण ब्लीच वापरण्याची परवानगी दर्शवू शकतो. त्रिकोणावर क्रॉस असेल, तर ब्लीच वापरू नये. काही त्रिकोणांमध्ये दोन तिरक्या रेषा असतात, ज्याचा अर्थ विशिष्ट प्रकारचे ब्लीच वापरण्यापुरती परवानगी असा असू शकतो.
3) चौकोन आणि वर्तुळ
चौकोनाच्या आत वर्तुळ असलेलं चिन्ह कपडे ड्रायरमध्ये वाळवण्याशी संबंधित आहे. त्यामधील ठिपके ड्रायरसाठी योग्य तापमान दर्शवतात. या चिन्हावर क्रॉस असेल, तर मशीन ड्रायर वापरू नये. अशा वेळी कपड्याच्या सूचनांनुसार नैसर्गिक पद्धतीने वाळवणं योग्य ठरू शकतं.
4) इस्त्रीचे चिन्ह
इस्त्रीचं चिन्ह कपड्यांना किती तापमानात इस्त्री करावी, याची माहिती देतं. इस्त्रीवरील एक ठिपका कमी तापमान, दोन ठिपके मध्यम तापमान आणि तीन ठिपके अधिक तापमान दर्शवतात. इस्त्रीच्या चिन्हावर क्रॉस असेल, तर त्या कपड्याला इस्त्री करू नये.
5) गोल चिन्ह
टॅगवर केवळ गोल आकार दिसत असेल, तर तो ड्राय क्लीनिंगशी संबंधित असतो. गोल चिन्हावरील क्रॉस ड्राय क्लीनिंग करू नये, असं दर्शवतो. गोलाच्या आत असलेली अक्षरं व्यावसायिक ड्राय क्लीनिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेबद्दल माहिती देतात. अशा कपड्यांसाठी टॅगवरील सूचना पाळणं महत्वाचं आहे.
कपड्यांच्या टॅगवरील ही चिन्हं केवळ माहिती देण्यासाठी नसतात, तर कपड्यांचं आयुष्य वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात. विशेषतः महागडे कपडे, जीन्स, स्वेटर, रेशमी कपडे किंवा नाजूक फॅब्रिक धुताना ही माहिती लक्षात घेणं फायद्याचं ठरतं.
Comments are closed.