जुन्या लोकरीच्या कपड्यांपासून बनवा ‘डोअर मॅट ते सॉफ्ट टॉय’
हिवाळा संपल्यानंतर स्वेटर, शाल, मफलर, लोकरीची टोपी आणि इतर उबदार कपडे कपाटात तसेच पडून राहतात. काही कपडे जुने झालेले असतात, तर काहींचा रंग फिका पडलेला असतो. असे कपडे फेकून देण्याऐवजी थोडी कल्पकता वापरून त्यांचा रियूज करता येतो. त्यापासून तुम्ही आकर्षक आणि उपयोगी वस्तू बनवू शकतो.
१. कुशन कव्हर
जुन्या स्वेटरचा मऊ आणि सुंदर भाग कापून त्यापासून सोफ्यासाठी किंवा बेडसाठी कुशन कव्हर तयार करता येते. त्यावर बटणे, लेस किंवा रंगीत धाग्यांनी डिजाईनही करू शकता.
२. स्टायलिश बॅग
जुन्या स्वेटरचा वापर करून छोटी हँडबॅग, टोट बॅग किंवा स्लिंग बॅग तयार करता येते. त्याला आकर्षक हँडल आणि झिप लावल्यास ती वापरण्यासाठी तयार होते.
३. हातमोजे
जुन्या स्वेटरच्या बाह्यांचा वापर करून हातमोजे तयार करा. थंडीच्या दिवसांत घराबाहेर जाताना किंवा दुचाकी चालवताना ते उपयोगी पडतील.
४. डोअरमॅट
जुन्या लोकरीचे तुकडे एकत्र करून त्यांची वेणी किंवा गुंडाळी तयार करा. त्यापासून रंगीबेरंगी डोअरमॅट बनवता येईल.
५. कोझी कव्हर
जुन्या लोकरीच्या कपड्यांपासून चहाच्या किंवा कॉफीच्या कपांसाठी आकर्षक कव्हर तयार करा. यामुळे कपला वेगळा लूक मिळतो आणि हाताला गरम कपाचा थेट स्पर्शही कमी होतो.
6. मऊ खेळणी
जुन्या लोकरीच्या कपड्यांपासून टेडी बेअर, ससा, बाहुली किंवा इतर मऊ खेळणी बनवता येतात. मात्र त्यासाठी स्वच्छ कपडे वापरावे.
७. टेबल रनर आणि टेबल मॅट
जुन्या लोकरीच्या कपड्यांचे छोटे तुकडे एकत्र शिवून आकर्षक टेबल रनर, प्लेसमॅट किंवा कोस्टर तयार करता येतात.
८. मोबाईल आणि लॅपटॉप कव्हर
जुन्या जाड स्वेटरचा वापर करून मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपसाठी मऊ कव्हर तयार करा. आतील बाजूस अस्तर लावल्यास ते अधिक टिकाऊ होईल.
९. फ्लॉवर पॉट कव्हर
जुन्या लोकरीच्या कपड्यांचा वापर करून कुंड्यांसाठी सुंदर कव्हर तयार करा. त्यामुळे घरातील इनडोअर प्लांट्सना आकर्षक लूक मिळेल. मात्र कुंडीच्या तळाशी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
१०. पाळीव प्राण्यांसाठी बेड
जुन्या स्वेटरमध्ये मऊ कापड किंवा दुसरे जुने कपडे भरून मांजर किंवा कुत्र्यासाठी आरामदायी बेड तयार करता येईल.
जुन्या लोकरीच्या कपड्यांचा पुनर्वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवा
– कपडे वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवून घ्यावे.
– फाटलेले किंवा खराब झालेले भाग वेगळे करावे.
– लोकरीचे धागे सुटत असल्यास कडा व्यवस्थित शिवून घ्याव्यात.
– मुलांसाठी वस्तू बनवताना सुरक्षितता आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
Comments are closed.