Mens Health Tips : निरोगी आणि तणावमुक्त आयुष्यासाठी पुरुषांनी या सवयी अंगीकारणे गरजेचे

धकाधकीच्या जीवनशैलीत आणि कामाच्या वाढत्या ताणामुळे अनेक पुरुष आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, दीर्घकालीन आणि निरोगी आयुष्यासाठी दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते. आज सर्वत्र 19 नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष दिन साजरा होत आहे. आजच्या या विशेष दिनी पुरुषांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात,

संतुलित आहार आणि हायड्रेशन

पुरुषांनी आपल्या आहारात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा योग्य समतोल राखणे गरजेचे आहे. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्ये, सुकामेवा आणि संपूर्ण धान्यांचा समावेश फायदेशीर ठरेल. प्रक्रिया केलेले अन्न, अतिगोड पदार्थ, तळलेले खाद्यपदार्थ आणि अतिमद्यपान टाळावे. तसेच, शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रण

हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी आठवड्यातून किमान पाच दिवस 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा. चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग यांसारखे प्रकार उपयुक्त ठरतात. वाढत्या पोटाचा घेर आणि लठ्ठपणा मधुमेह, रक्तदाबाचा धोका वाढवू शकतो, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.

झोप आणि तणाव व्यवस्थापन

दररोज रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप घेतल्यास शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कामाचा ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम किंवा आवडत्या छंदांसाठी वेळ काढावा.

नियमित आरोग्य तपासणी

वय वाढत जाईल तसे रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, हृदय आणि प्रोस्टेटशी संबंधित नियमित तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. वेळेवर निदान झाल्यास संभाव्य धोके टाळता येतात.

Comments are closed.