Bride Emergency Kit : नववधूच्या हँडबॅगमध्ये या गोष्टी असायलाच हव्यात

लग्नानंतर पहिल्यांदाच सासरच्या मंडळींसोबत बाहेर जाणं असो किंवा एखाद्या लग्नसमारंभात तासनतास थांबणं असो, नववधूला अनेकदा छोट्या अडचणींचा सामना करावा लागतो. महागडा मेकअप, सुंदर साडी आणि दागिने यांची तयारी होते; पण ऐनवेळी साडीची पिन निसटली, मोबाईल बंद पडला किंवा अचानक डोकेदुखी सुरू झाली तर? अशा प्रसंगांमध्ये स्वतःजवळ काही आवश्यक वस्तू असतील तर दुसऱ्यांची मदत शोधण्याची धावपळ करावी लागत नाही. म्हणूनच नववधूने आपली हँडबॅग केवळ दिसायला सुंदर नाही, तर उपयोगी वस्तूंनीही परिपूर्ण ठेवायला हवी.

1) लिप बाम आणि कॉम्पॅक्ट पावडर
लग्नानंतर सतत मेकअप करून राहावं लागतं. त्यामुळे ओठ कोरडे पडणे किंवा चेहरा थकलेला दिसणे स्वाभाविक आहे. अशावेळी लिप बाम आणि छोटी कॉम्पॅक्ट पावडर उपयोगी पडते. काही मिनिटांत चेहऱ्याला फ्रेश लुक देता येतो.

2) ट्रॅव्हल साइज परफ्यूम
दिवसभराची धावपळ, प्रवास आणि कार्यक्रम यामुळे घाम येऊ शकतो. त्यामुळे हँडबॅगमध्ये सौम्य सुगंधाचा ट्रॅव्हल साइज परफ्यूम ठेवा.

3) सेफ्टी पिन आणि हेअरपिन
साडीचा पदर सांभाळण्यापासून ते ब्लाऊजची छोटी दुरुस्ती करण्यापर्यंत सेफ्टी पिन उपयोगी पडते. तसेच हेअरपिन आणि रबर बँडमुळे विस्कटलेले केसही लगेच व्यवस्थित करता येतात.

४) टिश्यू पेपर/वेट वाइप्स
बाहेर असताना हात स्वच्छ करणे, चेहऱ्यावरील घाम पुसणे किंवा मेकअप ठीक करणे अशा अनेक कामांसाठी टिश्यू आणि वेट वाइप्स उपयोगी पडतात.

5) सॅनिटरी पॅड
मासिक पाळीची तारीख जवळ नसली तरी हँडबॅगमध्ये एक-दोन सॅनिटरी पॅड ठेवा. अचानक गरज भासल्यास त्याचा उपयोग होतो.

6) थोडे रोख पैसे आणि कार्ड
प्रत्येक वेळी ऑनलाइन पेमेंट शक्य होईलच असं नाही. त्यामुळे ऑटो, खरेदी किंवा इतर छोट्या खर्चांसाठी काही रोख पैसे आणि एक कार्ड जवळ ठेवा.

7) बँडेज आणि आवश्यक औषधे
डोकेदुखी, पोटाचा त्रास किंवा नवीन चपलांमुळे पायाला फोड येणे अशा प्रसंगी प्राथमिक गरजांसाठी बँडेज आणि स्वतःला सुरक्षितपणे घेता येणारी आवश्यक औषधे सोबत ठेवा.

8) चार्जिंग केबल आणि पॉवर बँक
कार्यक्रम, प्रवास किंवा खरेदीदरम्यान मोबाईलची बॅटरी संपल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे चार्जिंग केबल आणि चार्ज केलेली छोटी पॉवर बँक बॅगमध्ये ठेवा.

हँडबॅगमध्ये या सगळ्या वस्तू ठेवताना त्याचा आकार आणि वजन लक्षात घ्या. शक्यतो ट्रॅव्हल साइज प्रोडक्ट्स वापरा आणि आठवड्यातून एकदा बॅगमधील सामान तपासा.

Comments are closed.