सकाळी उठताच सोशल मीडिया स्क्रोल करण्याऐवजी करा या गोष्टी
आजकाल अनेकांची सकाळ मोबाईलच्या स्क्रीननेच सुरू होते. डोळे उघडताच सर्वात आधी हात जातो तो फोनकडे! व्हॉट्सॲप मेसेज, इन्स्टाग्राम रील्स, फेसबुकवरील पोस्ट पाहण्यात कधी अर्धा तास निघून जातो, हे कळतही नाही. मात्र, दिवसाची सुरुवातच सोशल मीडिया स्क्रोलिंगने केल्यामुळे नकळत मनावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. दुसऱ्यांचे आयुष्य, त्यांचे यश, फिरण्याचे फोटो पाहताना आपणही नकळत तुलना करू लागतो. मग स्वतःच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होण्याऐवजी विचारांच्या गर्दीने होते.
मग सकाळी उठल्यानंतर नेमकं काय करावं?
पाणी पिण्याची सवय
रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीराला पाणी मिळण्यास मदत होते. मोबाईल हातात घेण्याऐवजी आधी स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या.
काही वेळ शांत बसा
सकाळी पाच मिनिटे शांत बसून दीर्घ श्वास घ्या. मनात सुरू असलेले विचार बाजूला ठेवून स्वतःशी संवाद साधा. यामुळे दिवसाची सुरुवात अधिक शांतपणे करता येईल.
घराच्या खिडक्या उघडा
सकाळचा नैसर्गिक प्रकाश घरात येऊ द्या. खिडकीत उभे राहून बाहेरचा निसर्ग पाहा. पक्ष्यांचा आवाज, गार वारा आणि सकाळचे वातावरण मन प्रसन्न करण्यास मदत करू शकते.
आवडत्या गोष्टीसाठी वेळ
पुस्तकाची दोन पाने वाचा, आवडते गाणे ऐका किंवा छोटीशी बागकामाची कामे करा. दिवसातील काही मिनिटे आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी राखून ठेवल्याने स्वतःसाठी वेळ दिल्याचे समाधान मिळते.
दिवसाचे नियोजन
आज कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, याची छोटी यादी तयार करा. तीन महत्त्वाची कामे लिहून ठेवा. त्यामुळे दिवसाची दिशा ठरवणे सोपे जाईल.
दिवसातील पहिली काही मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवणे महत्वाचे असते कारण सकाळची सुरुवात कशी होते, याचा परिणाम आपल्या मनःस्थितीवर आणि दिनक्रमावर होऊ शकतो. उद्यापासून उठल्यावर लगेच फोन हातात घेण्याऐवजी स्वतःला थोडा वेळ द्या. यामुळे तुमच्या दिवसात मोठा सकारात्मक बदल घडवू शकेल.
Comments are closed.