डाएटमध्ये Cheat Day खरंच फायदेशीर आहे का?
वजन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक जण आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवू लागतात. गोड पदार्थ, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट किंवा आवडती मिठाई यांना काही काळासाठी दूर ठेवले जाते. सुरुवातीला हा बदल सोपा वाटतो; पण काही दिवसांनी सतत आवडते पदार्थ खाण्याची इच्छा होऊ लागते. अशावेळी अनेक जण डाएटमध्ये एक दिवस Cheat Day ठेवतात. म्हणजेच आठवड्यातील एखाद्या दिवशी आवडीचे पदार्थ मनसोक्त खाण्याची मुभा स्वतःला देतात. पण खरंच Cheat Day मुळे वजन कमी करण्यास मदत होते का? की त्यामुळे डाएटचे संपूर्ण गणित बिघडू शकते?
मानसिक उपाय
सतत आवडते पदार्थ टाळल्यामुळे काही जणांना डाएटचा कंटाळा येऊ शकतो. अशावेळी अधूनमधून आवडता पदार्थ खाल्ल्याने मानसिक समाधान मिळू शकते. डाएट करताना प्रत्येक आवडीच्या पदार्थावर कायमची बंदी घालण्याची गरज नसते.
Cheat Day म्हणजे दिवसभर खाणे?
Cheat Day च्या नावाखाली दिवसभर जास्त प्रमाणात खाणे टाळा. एका दिवसात गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतल्यास वजन कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आवडता पदार्थ खा; पण प्रमाणात
शरीराचे मेटाबॉलिझम
Cheat Day मुळे शरीराचे मेटाबॉलिझम अचानक वाढते आणि वजन वेगाने कमी होते, असा दावा केला जातो. मात्र, याला ठोस वैज्ञानिक आधार नाही. एखाद्या दिवशी जास्त खाल्ल्याने शरीराची चरबी जादूने कमी होत नाही.
चिट जेवण
संपूर्ण दिवस Cheat Day ठेवण्याऐवजी एखाद्या जेवणात आवडता पदार्थ समाविष्ट करा. उदाहरणार्थ, रविवारी आवडती बिर्याणी किंवा पिझ्झा खायचा असेल तर तो मर्यादित प्रमाणात खा. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवणे तुलनेने सोपे जाते.
उपाशी राहू नका
Cheat Day ला जास्त खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास करणे किंवा जेवण टाळणे योग्य नाही. पुन्हा आपल्या नियमित आणि संतुलित आहाराकडे वळा. पुरेसे पाणी प्या आणि नेहमीचा व्यायाम सुरू ठेवा.
वजन कमी करण्यासाठी एखाद्या दिवसाचे खाणे नव्हे, तर दीर्घकाळ टिकणाऱ्या आहाराच्या सवयी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे Cheat Day ठेवणे प्रत्येकासाठी आवश्यक नाही.
Comments are closed.