शरीर आणि मनाला निरोगी ठेवणारा सात्विक आहार, काय आहेत त्याचे फायदे?
सध्याची लाईफस्टाईल पाहता तुम्ही काय खाता काय खातो याचा थेट परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. योग्य पोषण मिळण्यासाठी केवळ पोट भरणे पुरेसे नाही, तर अन्नाची गुणवत्ता आणि प्रकारही महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये ज्याला सर्वोच्च स्थान दिले आहे, असा ‘सात्विक आहार’ आरोग्यासाठी वरदान ठरत आहे.
सात्विक आहार म्हणजे असा आहार, जो शरीरात ऊर्जा आणि शुद्धता वाढवण्याचे काम करतो. सात्विक आहारात प्रामुख्याने ताजी फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, सुका मेवा, दूध, मध, तांदूळ आणि गव्हाचा समावेश होतो. हा आहार नैसर्गिक आणि साध्या पद्धतीने शिजवलेला असतो, ज्यामुळे अन्नातील पोषकतत्त्वे टिकून राहतात.
शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम
सात्विक आहार पचायला हलका असतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. या अन्नात फायबर आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुम्ही जर नियमितपणे सात्विक जेवण केलेत तर शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, वजन नियंत्रणात राहते आणि रक्ताभिसरण सुरळीत होते. यासह व्यक्तीला दिवसभर उत्साह आणि ऊर्जा जाणवते.
मनावर होणारे परिणाम
सात्विक आहार मनाला शांत आणि स्थिर ठेवतो. हा आहार मनातील नकारात्मक विचार, राग आणि चिंता कमी करण्यास मदत करतो. ताजे आणि साधे अन्न खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते, एकाग्रता सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते. यामुळेच प्राचीन काळी ऋषी-मुनी सात्विक आहाराचे सेवन करत असत.
थोडक्यात सांगायचे तर सात्विक आहार हा केवळ एक आहार नसून ती एक निरोगी जीवनशैली आहे.
हेही वाचा – नैसर्गिक ताजी फळे आणि कृत्रिम रंग लावलेली फळे कशी ओळखावी?
Comments are closed.