हिवाळ्यात तहान कमी लागत असल्याने शरीर हायड्रेट कसे ठेवावे?

हिवाळ्यात थंडीमुळे उन्हाळ्याच्या तुलनेत कमी तहान लागते. त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण नकळत कमी होते. मात्र, शरीराला प्रत्येक ऋतूत पुरेशा पाण्याची गरज असते. पाणी कमी प्यायल्यास त्वचा कोरडी पडणे, थकवा जाणवणे, बद्धकोष्ठता आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यातही शरीर हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी काही सोप्या सवयी फॉलो करता येतील हे पाहूयात

कोमट पाण्याचा वापर

थंड पाण्याऐवजी दिवसभरात थोडे-थोडे कोमट पाणी पिण्याची सवय लावावी. ते प्यायला सोपे वाटते आणि शरीराला उबही मिळते.

तहान लागण्याची वाट पाहू नये

दर तासाला किंवा जेवणापूर्वी थोडे पाणी पिण्याचा नियम ठेवावा. काम करताना जवळ पाण्याची बाटली ठेवावी, यामुळे आठवण राहील.

सकाळची सुरुवात

उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे रात्रभराची पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

हंगामी फळे

संत्री, मोसंबी, पेरू, सफरचंद आणि डाळिंब यांसारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. यांचा आहारात समावेश करावा.

भाज्या आणि सॅलड

काकडी, टोमॅटो, मुळा, पालक आणि कोबी यांचा जेवणात समावेश करा.

सूप

मिश्र भाज्यांचे सूप, टोमॅटो सूप किंवा डाळीचे सूप हिवाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचा आणि उब देण्याचा उत्तम पर्याय आहे.

हर्बल चहा

थंडीत चहा-कॉफीचे प्रमाण खूप वाढवण्याऐवजी तुळस, आले किंवा पुदिन्याचा हर्बल टी घेऊ शकता.

शरीरातील पाण्याची पातळी कशी ओळखाल?

  • लघवीचा रंग फिकट पिवळा किंवा स्वच्छ असेल तर शरीर पुरेसे हायड्रेटेड आहे असे समजावे. रंग गडद पिवळा असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवावे.
  • ओठ किंवा तोंड कोरडे पडणे, विनाकारण थकवा येणे किंवा डोकेदुखी जाणवणे ही पाण्याची कमतरता होत असल्याची लक्षणे असू शकतात.

हेही वाचा – शरीर आणि मनाला निरोगी ठेवणारा सात्विक आहार, काय आहेत त्याचे फायदे?

Comments are closed.