थंडीत वारंवार लघवी होण्यामागची नेमकी कारणं काय?

हिवाळा सुरू झाला की अनेकांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उन्हाळ्याच्या तुलनेत थंडीत वारंवार लघवीला जावे लागते. कधी सकाळी उठल्यावर तर कधी रात्री गाढ झोपेतून उठून बाथरूमला जावे लागते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, पाणी कमी प्यायले तरी थंडीत लघवी जास्त का होते? खरं तर यामागे केवळ पाणी पिण्याचे प्रमाण कारणीभूत नसते, तर थंड हवामानात शरीरात होणारे काही नैसर्गिक बदलही यासाठी जबाबदार असतात.

‘हे’ बदल असू शकतात कारणीभूत

1) रक्तवाहिन्या आकुंचन पावणे
थंड वातावरणात शरीर उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्वचेच्या जवळील रक्तवाहिन्या आकुंचित करते. त्यामुळे रक्तदाबात किंचित वाढ होऊ शकते. अशावेळी मूत्रपिंड अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्याचे काम करतात. याला कोल्ड डाययुरेसिस असे म्हणतात.

2) घाम कमी येणे
उन्हाळ्यात घामाच्या माध्यमातून शरीरातील पाणी बाहेर पडते. मात्र, थंडीत घामाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त द्रव लघवीच्या माध्यमातून बाहेर पडू शकते.

3) पाण्याचे सेवन कमी होणे
थंडीत तहान कमी लागते. त्यामुळे अनेकजण पाणी कमी पितात. मात्र, शरीराला आवश्यक पाणी न मिळाल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून तहान लागली नसली तरी नियमित पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

4) चहा-कॉफीचे वाढते प्रमाण
थंडीत गरम चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण वाढते. कॅफिनमुळे काही लोकांना लघवीची वारंवारता वाढल्याचा अनुभव येऊ शकतो.

5) मूत्राशयाची संवेदनशीलता
काही व्यक्तींमध्ये थंड हवामानामुळे मूत्राशय अधिक संवेदनशील होऊ शकतो. त्यामुळे लघवीला वारंवार जाण्याची भावना निर्माण होऊ शकते.

थंडीत वारंवार लघवी होणे अनेकदा शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया असू शकते. मात्र, लघवी करताना जळजळ, वेदना, ताप, रक्त येणे, खूप तहान लागणे किंवा रात्री वारंवार झोपमोड होणे अशी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रत्येक वेळी यामागे थंडीच कारणीभूत असेल असे नाही.

Comments are closed.