9 सामन्यांत 106 'नो-बॉल्स', पाकिस्तानच्या नावावर लाजिरवाण्या 'वर्ल्ड रेकॉर्ड'ची नोंद!

नो-बॉल्स आणि पाकिस्तानचे नाते सर्व क्रिकेट चाहत्यांना चांगलेच माहित आहे. यावर्षी तर त्यांनी कहरच केला आहे. श्रीलंका क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून, दोन्ही संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडी येथे १७ नोव्हेंबरपासून खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत पाकिस्तानी गोलंदाजांनी अनेक नो-बॉल टाकले आणि एका नकोश्या विक्रमामध्ये आणखी वाढ केली.

पाकिस्तानने २०२६ मध्ये आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांदरम्यान पाकिस्तानी गोलंदाजांनी इतके नो-बॉल टाकले की तो रेकॉर्ड कोणीही मोडू शकणार नाही. पाकिस्तानने या ९ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक १०६ नो-बॉल्स टाकले आहे. ५४ नो-बॉल्ससह बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे.

यावर्षी कसोटीमध्ये सर्वाधिक नो-बॉल्स टाकणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांची आकडेवारी पाहता पाकिस्तानच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नो-बॉल्स टाकले असले, तरी त्यांची गोलंदाजी प्रभावी राहिली. कारण श्रीलंकेचा पहिला डाव ९८ धावसंख्येवरच संपुष्टात आला. यामध्ये मोहम्मद अब्बास, रझाउल्लाह आणि आमेर जमाल यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेला १०० धावांच्या आता रोखून पाकिस्तानने फलंदाजीला येत पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक धावा विकेटकीपर-फलंदाज गाझी घोरी याने केल्या. त्याने ९० चेंडूंत ५४ धावा केल्या.

श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू असून, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाहुण्या संघाने ९ विकेट्स गमावून ३०९ धावा करत ८२ धावांची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२७ चा भाग आहे.

कसोटी मालिकेआधी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली, जी श्रीलंकेने २-१ अशी जिंकली होती.

Comments are closed.