11 चौकार, 5 षटकार… टी20 वर्ल्ड कपपूर्वी मिचेल मार्शने ठोकले वादळी शतक!
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी मिचेल मार्श जबरदस्त फॉर्ममध्ये परतला आहे. बिग बॅश लीगमध्ये मार्शने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पर्थ स्कॉचर्सकडून खेळताना मार्शने धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या 55 चेंडूत शतक ठोकले.
175 च्या स्ट्राईक रेटने खेळताना कांगारू कर्णधाराने 11 चौकार आणि 5 षटकार लगावले. मार्शच्या या स्फोटक खेळीच्या जोरावर पर्थच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून धावफलकावर 229 धावा लावल्या.
होबार्ट हरिकेन्सने नाणेफेक जिंकून पर्थ स्कॉचर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संघाची सुरुवात चांगली झाली नाही, फिन ॲलन अवघ्या 16 धावा करून बाद झाला. तर कूपर कोनोली देखील बॅटने विशेष काही करू शकला नाही आणि फक्त 4 धावा करून बाद झाला. मात्र, मार्शने एका बाजूने आपली तुफानी फलंदाजी सुरूच ठेवली.
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मार्श अधिक आक्रमकपणे खेळताना दिसला आणि त्याने 55 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मार्शला दुसऱ्या बाजूने आरोन हार्डीची चांगली साथ मिळाली. मार्शने 58 चेंडूत 102 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या या खेळी दरम्यान 11 वेळा चेंडू सीमापार धाडला, तर 5 वेळा चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवला.
हार्डीची बॅटही चांगलीच तळपली आणि त्याने अवघ्या 43 चेंडूंचा सामना करत नाबाद 94 धावा कुटल्या. हार्डीने आपल्या या खेळीत 218 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 9 चौकार आणि 5 षटकार ठोकले, ज्याच्या जोरावर पर्थचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.
मिचेल मार्श फॉर्ममध्ये परतणे ही ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी आहे. मार्श एकहाती कोणत्याही सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद ठेवतो. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कर्णधारपदासोबतच मार्शवर बॅटनेही धमाकेदार कामगिरी करण्याची मोठी जबाबदारी असेल.
Comments are closed.