जळगावमध्ये रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला

प्रतिनिधी / जळगाव, पुणे

जळगावच्या पाचोराजवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ डब्याला आग लागल्याच्या अफवेतून पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारणारे प्रवासी शेजारील ट्रॅकवरून आलेल्या बेंगळूर एक्स्पे्रसखाली सापडल्याने झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 40 हुन अधिक जण जखमी झाले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी जोखीम पत्करली. मात्र, तीच प्रवाशांच्या जीवावर बेतल्याने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दुपारी चारच्या सुमारास पुष्पक एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानक सोडले. त्यानंतर गाडी पावणेपाचच्या सुमारास पाचोऱ्याजवळ आली असता ब्र्रेक दाबल्यामुळे गाडीच्या चाकातून ठिणग्या बाहेर पडल्या आणि मोठ्या प्रमाणात धूर आला. मात्र, त्यातूनच डब्यामध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे गाडीतच एकच गोंधळ उडाला. अशातच काही प्रवाशांना गाडीची साखळी खेचली. त्यानंतर जीवाच्या भीतीने डब्यातील 40 ते 50 प्रवाशांनी घाबरून शेजारील ऊळांवर उड्या मारल्या. त्याच सुमारास दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बेंगळूर एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडले. या अपघातात दहा ते बारा प्रवाशांचा गाडीखाली सापडून मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. जखमींना पाचोरा ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

कम्युनिकेशन गॅपमुळे अपघात

पुष्पक एक्स्प्रेस ही भुसावळहून मुंबईला येत असताना कॉशन ऑर्डर म्हणजे काम सुरू असल्याने तिने स्टॉप घेतला होता. परंतु, कॉशन ऑर्डर ही स्टेशनला घेतली असती, तर अपघात टळला असता. त्यामुळे यात कम्युनिकेशन गॅप दिसतो, असा आरोप ठाकरे सेनेचे नेते उन्मेष पाटील यांनी केला आहे.

आगीच्या अफवेतूनच दुर्घटना

गाडी मुंबईकडे येत असताना कुणीतरी गाडीला आग लागल्याचे कुणीतरी ओरडले. त्यामुळे गाडीच एकच हलकल्लोळ माजला. काही लोकांनी पटापट उड्या मारल्या. हे लोक दुसऱ्या रूळावरून येणाऱ्या रेल्वेखाली सापडले आणि त्यातून हा अपघात झाला, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दरम्यान, अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचत मदत कार्य सुरू केले. बेंगळूर एक्स्प्रेसच्या खाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर तातडीने जखमींना ऊग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख ऊपयांची आर्थिक मदत घोषित केली. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या.

रेल्वे रुळावर ओलांडताना अपघात – गुलाबराव पाटील

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले आहे. हा रेल्वे अपघात रेल्वे रुळ ओलांडताना झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेची माहिती अजून यायची आहे. प्रशासन कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले.

Comments are closed.