11 महागडी विमानं पडली; मोदींना फोन करून म्हणालो, 200 टक्के टॅरिफ लावेन, तेव्हा कुठे युद्ध थांबलं! डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्धाची ठिणगी पडली होती आणि हे युद्ध आपण रोखल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला आहे. दोन्ही देशांना फोन करून आपण 200 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली. पैशाचा विषय आल्यावर दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला, असे ट्रम्प म्हणाले.
वॉशिंग्टन डीसी येथील ‘डोनाल्ड जे. ट्रम्प इन्स्टिट्यूट ऑफ पीस’मध्ये आयोजित ‘बोर्ड ऑफ पीस’च्या पहिल्या बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी हा दावा केला. एवढेच नाही तर मे 2025 मध्ये झालेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धादरम्यान 5 विमाने पडल्याचा दावा ट्रम्प यांनी सुरुवातीला केला होता. मात्र आता त्यांनी या संघर्षावेळी 11 महागडी विमाने पडली असा दावा केला आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान लष्करी तणावाचा संदर्भ देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांमधील युद्ध अत्यंत भीषण होते आणि विमाने पाडली जात होती. मी दोन्ही देशांच्या प्रमुखांना फोन केला आणि स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर तुम्ही हे युद्ध थांबवले नाही, तर मी दोन्ही देशांवर 200 टक्के टॅरिफ लावेन. कोणत्याही व्यापार करारावर मी स्वाक्षरी करणार नाही.
जेव्हा दोन्ही देशांना मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती वाटली, तेव्हा त्यांनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पैशाचा विषय आला, तेव्हा त्यांना लढायची इच्छा उरली नाही. या संघर्षात 11 महागडी लढाऊ विमाने पाडली गेल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले.
#पाहा | बोर्ड ऑफ पीस इव्हेंटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “…ते (पाकिस्तानी पंतप्रधान) आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर म्हणाले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आमचे आणि भारतातील युद्ध थांबवले तेव्हा त्यांनी 25 दशलक्ष लोकांचे प्राण वाचवले…ते युद्ध चिघळत होते. विमाने पाडली जात होती. आणि मी… pic.twitter.com/pm5eT7xjz3
— ANI (@ANI) 19 फेब्रुवारी 2026
दरम्यान, या कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ उपस्थित होते. ट्रम्प यांनी शरीफ यांच्या विधानाचा दाखला देत स्वतःच्या शांतता प्रयत्नांचे समर्थन केले. पाकिस्तानने ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’चे सदस्यत्व तातडीने स्वीकारले आहे. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शरीफ यांनी ट्रम्प यांना ‘नोबेल शांतता पुरस्कारा’साठी नामांकित करण्याचेही समर्थन केले आहे. तर दुसरीकडे हिंदुस्थानने या बैठकीत केवळ एक ‘निरीक्षक देश’ म्हणून सहभाग घेतला. हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व भारतीय दूतावासातील ‘चार्ज डी अफेअर्स’ नमग्या खंपा यांनी केले.
Comments are closed.