साहित्य संमेलनात होणार 110 पुस्तकांचे प्रकाशन

सातारा येथे होणाऱया 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातील लेखकांची तब्बल 110 पुस्तके प्रकाशित होत आहेत. पाच सत्रांत होणाऱया या प्रकाशन कट्टय़ाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रकाशन कट्टय़ाचे घनश्याम पाटील यांनी दिली.

1 जानेवारी रोजी पहिल्या सत्रात राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांच्या ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक भाषणाचा आढावा घेणारे ‘जनसंवाद राजमातांचा’ आणि नरहर कुरुंदकर यांचे ‘युगप्रवर्तक छत्रपती’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तर चपराक प्रकाशनाची ब्रेल लिपीतील पाच पुस्तके प्रकाशित होत आहेत.

मराठीतील ज्ञानभांडार अंध वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी चपराक प्रकाशनने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. संत ज्ञानेश्वरांनी जो शिक्षण विचार दिला त्यासंदर्भातील संदीप वाकचौरे यांचे शिक्षणाचे पसायदान, सुहास कोळेकर यांचे रॅगिंगचे दिवस, प्रसिद्ध नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे यांचे चक्र आणि इतर नाटके आणि चंद्रलेखा बेलसरे यांचे राखणदार आणि सत्यापितम या कथासंग्रहांचा यात समावेश असणार आहे.

Comments are closed.