Pimpri Chinchwad News – लिफ्टमध्ये अडकून भीषण अपघात, दसऱ्याच्या दिवशी 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवडच्या चोवीसवाडीमध्ये दसऱ्याच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. येथे लिफ्टच्या एका भीषण अपघातात 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्यामध्येच लिफ्टमध्ये अडकला होता. मुलगा तब्बल तीन तासांहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकून होता. त्याचे दोन्ही पाय तिसऱ्या मजल्यावर होते, तर लिफ्ट वरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली. ऐन दसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अमेय फडतरे (वय ११, रा. रामस्मृती हाउसिंग सोसायटी, चोवीसावाडी) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदकरण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सायंकाळी 5.05वाजता या घटनेची माहिती मिळाली. मात्र, सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, तो मुलगा दुपारी ३ वाजल्यापासून लिफ्टमध्ये अडकला होता. पण कोणाच्याही हे लक्षात आले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लिफ्ट उघडून मुलाला बाहेर काढले.

दरम्यान, मुलाची तब्येत नाजूक असल्याने त्याला तातडीने जवळच्या के.के. रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, पण काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे चौवीसवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच पोलिसही या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत.

Comments are closed.